दोन दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियातील ड्रग्ज तस्कराला एलएसडी ड्रग्जच्या साठय़ासह रंगेहाथ पकडल्यानंतर अमली पदार्थविरोधी पथकाने साकीनाका येथे पुन्हा मोठी कारवाई केली. यावेळी पोलिसांनी आयव्हरी कोस्ट येथील ड्रग्जमाफियाला पोलिसांनी 1 कोटी 32 लाख किमतीच्या 220 ग्रॅम कोकेनसह रंगेहाथ पकडले.
आयव्हरी कोस्ट येथे राहणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरील ड्रग्जमाफिया कोकेनचा साठा उपनगरातील पब तसेच घरात, व्हिला किंवा समुद्रकिनारी आयोजित होणाऱया पाटर्य़ांमध्ये तो माफिया कोकेन पुरविण्याचे काम करतो. तो आता साकीनाका येथील 90 फिट रोडवरील पेनिनसुला हॉटेल परिसरात कोकेनचा साठा घेऊन येणार असल्याची खबर अमली पदार्थविरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार वांद्रे युनिटचे प्रभारी पोलीस निरीक्षक अनिल वाढवणे, एपीआय बंडगर, उपनिरीक्षक पावले व पथकाने त्या ठिकाणी सापळा रचून आयव्हरी कोस्ट येथून उच्च प्रतीचा कोकेन साठा घेऊन आलेल्या अला कौऊडियो बोरीस (42) या ड्रग्जमाफियाला रंगेहाथ पकडले. त्याच्या अंगझडतीत 220 ग्रॅम कोकेन साठा सापडला. दोन दिवसांपूर्वी या पथकाने ऑस्ट्रेलियातून कोटय़वधी किमतीचा एलएसडी ड्रग्जचा साठा घेऊन आलेल्या रेझा बोराहनी याला पकडले होते.




























































