मुंबईत अतिरिक्त 2000 मेगावॅट वीज आणण्यासाठी अदानीने कंबर कसली, भूमिगत वाहिनीचे काम वेळेत पूर्ण करणार

मुंबईत मुबलक वीज उपलब्ध व्हावी म्हणून खारघर-विक्रोळी उच्च दाब वीजवाहिनी आणि विक्रोळी वीज उपकेंद्राचे काम वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ऊर्जा विभागाला दिले आहेत. त्याची दखल घेत अदानी ट्रान्समिशनने मुंबईत दोन हजार मेगावॅट अतिरिक्त वीज आणण्यासाठी कंबर कसली आहे. त्यानुसार खारघर-विक्रोळी 400 आणि 220 केव्हीची समांतर उच्च दाब वीजवाहिनी आणि विक्रोळी वीज उपकेंद्राचे काम विक्रमी वेळेत म्हणजे डिसेंबर 2022 पर्यंत पूर्ण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महापारेषणची वीजवाहिनी असलेल्या पुडोसपासून आरे कॉलनीपर्यंत भूमिगत वीजवाहिनी टाकण्यात येणार आहे. त्यामुळे राज्यभरातून अतिरिक्त दोन हजार मेगावॅट वीज मुंबईत येऊ शकणार आहे.

मुंबईची विजेची वाढती मागणी लक्षात घेता वीज आयोगाच्या निर्देशानुसार महापारेषणने 400 कोव्हीची खारघर-विक्रोळी उच्च दाब वीजवाहिनी आणि विक्रोळी येथे 400 केव्हीचे जीआयएस वीज उपकेंद्र उभारण्याचे काम 2013 मध्ये टाटा पॉवरला दिले होते. सदर काम त्यांनी न केल्याने महापारेषणने ते काम तीन महिन्यांपूर्वी अदानी ट्रान्समिशनला दिले आहे. त्यानुसार सदर काम डिसेंबर 2022 अखेर पूर्ण करण्यासाठी अदानीने सर्वेक्षण पूर्ण केले असून आवश्यक त्या परवानग्या आणि उपकरणांच्या खरेदीसाठीची प्रक्रिया सुरू केल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

हे काम पूर्ण झाल्यानंतर मुंबईत वाढीव एक हजार मेगावॅट वीज येऊ शकणार आहे. तसेच ठाणे जिल्ह्यातील पुडोसपर्यंत महापारेषणची 400 केव्हीची वीजवाहिनी आहे. तेथून अदानीच्या 220 केव्हीच्या आरे वीज उपकेंद्रापर्यंत 80 किलोमीटरची हाय व्होल्टेज डीसी केबल जमिनीखालून टाकण्यात येणार आहे. मुंबईच्या आयलँडिंगच्या दृष्टीने ही वाहिनी महत्त्वपूर्ण ठरणार असून त्याचेही काम तीन वर्षात पूर्ण करण्यात येणार असल्याचे अदानी ट्रान्समिशनने स्पष्ट केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या