माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांच्यासह सात जणांना अटक आणि सुटका

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राणा दांपत्याला अटक केल्यानंतर खार पोलीस ठाण्यात गेलेल्या किरीट सोमय्यांच्या गाडीवर हल्ला झाला होता. हल्ल्याप्रकरणी खार पोलिसांनी आज माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक हाजी हलीम खान, दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, सुनील जाधव, संदीप मेटकर, संजय जाधव यांना अटक केली. नंतर त्यांची जामिनावर सुटका करण्यात आली.

मातोश्रीवर येऊन हनुमान चालिसा पठण करणार असल्याचे सांगणाऱया नवनीत राणा आणि रवी राणाला खार पोलिसांनी नोटीस दिली. त्या नोटिशीचे उल्लंघन केल्याप्रकरणी खार पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली होती. अटकेची माहिती समजताच किरीट सोमय्या हे खार पोलीस ठाण्यात आले. तेव्हा शिवसैनिकाने सोमय्यांच्या गाडीवर हल्ला केला. यात सोमय्या हे किरकोळ जखमी झाले होते.

हल्ल्यानंतर रविवारी सोमय्या यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो खार पोलिसांकडे वर्ग केला. खार पोलिसांनी आज माजी महापौर विश्वनाथ महाडेश्वर, नगरसेवक हाजी अलीम खान, दिनेश कुबल, शेखर वायंगणकर, सुनील जाधव, संदीप मेटकर, संजय जाधव यांना नोटीस देऊन चौकशीसाठी बोलवले. काही तासांच्या चौकशीनंतर सायंकाळी पोलिसांनी महाडेश्वर यांच्यासह सात जणांना अटक केली. रात्री उशिरा त्यांची जामिनावर सुटका झाली.