
>> देवेंद्र भगत
पालिकेच्या हेरिटेज प्याऊंना लवकरच गतवैभव मिळणार असून या ठिकाणी मुंबईकरांना पिण्यासाठी फिल्टरचे शुद्ध पाणी मिळणार आहे. यामध्ये पालिकेच्या सर्व 29 प्याऊंची आवश्यक दुरुस्ती-सौंदर्यीकरण करण्यात येणार असून जल शुद्धीकरणाची अद्ययावत यंत्रणा बसवण्यात येणार आहे.
मुंबईत ठिकठिकाणी असणारे प्याऊ हे शहराचे हेरिटेज वैभव आहे. सुमारे शंभर ते दीडशे वर्षांपूर्वी बांधण्यात आलेले प्याऊ एकेकाळी मुंबईकरांची तहान भागवण्याचे काम करीत असत. फोर्ट, चर्चगेट, दादर आणि भायखळापर्यंत हे 29 प्याऊ आहेत. मात्र सद्यस्थितीत पालिकेच्या हद्दीत असणारे अनेक प्याऊ बंद अवस्थेत आहेत. तर अनेक जण स्वच्छतेच्या कारणास्तव अशा प्याऊंच्या ठिकाणी पाणी पिणे टाळतात. त्यामुळे पालिकेने प्याऊंना गतवैभव मिळवून देण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे. प्याऊंच्या दुरुस्ती-सौंदर्यीकरणात हेरिटेज दर्जाला कोणताही धक्का न लावता हे काम केले जाणार आहे.
दोन टप्प्यांत होणार काम
प्याऊंची दुरुस्ती-सौंदर्यीकरणाचे काम दोन टप्प्यांत केले जाणार आहे. यामध्ये पहिल्या टप्प्यात वीरमाता जिजाबाई भोसले उद्यानातील चार प्याऊंचे काम केले जाणार आहे. तर शिल्लक राहिलेल्या प्याऊंच्या कामासाठी सर्वेक्षण केल्यानंतर निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे. दुरुस्ती आणि सौंदर्यीकरणाच्या कामात प्रत्येक प्याऊसाठी सुमारे 20 ते 25 लाखांचा खर्च केला जाणार आहे.
असे मिळणार शुद्ध पाणी
सध्या प्याऊसाठी असणाऱया पाण्याच्या टाकीत थेट पाणी सोडले जाते. हे पाणी नळाद्वारे पिण्यासाठी उपलब्ध होते. मात्र नव्या पद्धतीत पिण्याचे पाणी नळाद्वारे बाहेर येण्याआधी फिल्टर यंत्रणेत साठवले जाईल. या ठिकाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया झालेले शुद्ध पाणीच नळाद्वारे पिण्यासाठी उपलब्ध होईल.
प्याऊंची सद्यस्थिती
- पालिकेच्या 29 प्याऊंपैकी हॉर्निमन सर्कल, ‘जीपीओ’समोरील प्याऊ, मस्जिद बंदर येथील केशवजी नाईक प्याऊ आणि वाडिया क्लॉक टॉवर पेरीनरीमन स्ट्रीट फोर्ट येथील प्याऊ सध्या सुरू आहेत. z शिवाय वेगवेगळ्या प्रकल्पात माधवराव कोठारी एमजी रोड प्याऊ, कावसजी जहांगीर डॉ. आंबेडकर रोड भायखळा आणि दादर गोखले रोड येथील आनंद विठ्ठल कोळी प्याऊ कार्यरत आहेत.





























































