
मुंबईत गेल्या पाच महिन्यांत 262 आगीच्या घटना घडल्या असून यात 30 ते 40 लाखांची वित्तहानी झाली. यात दोघे जण किरकोळ जखमी झाले. सुदैवाने या दुर्घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. त्याचबरोबर घर पडणे/इमारत कोसळणे, बुडाल्याने मृत्यू अशा 380 दुर्घटना घडल्या. त्यात 6 जणांचा मृत्यू झाला तर 7 जण जखमी झाले. या संदर्भातील अहवाल अग्निशमन दल स्थायी समितीच्या आगामी बैठकीत ठेवणार आहे.
मुंबई शहर तसेच उपनगरात काही ना काही दुर्घटना घडतात. कधी आग लागते तर काही वेळा घराचा भाग तसेच इमारती कोसळतात. कधी बुडाल्याने मृत्यु होतो. पालिका क्षेत्रात घडणाऱया या घटनांच्या पार्श्वभूमीवर पालिकेच्या अग्निशमन दलाला पाचारण केले जाते. अग्निशमन दलामार्फत बचावकार्य करण्यात येते. 16 सप्टेंबर 2019 ते 15 जानेवारी 2020 या पाच महिन्याच्या कालावधीत मुंबईत अशा प्रकारच्या एकूण 642 दुर्घटना घडल्या. माटुंगा आणि प्रभादेवीत लिफ्टच्या पिटमध्ये पडून 2 जणांचा तर घरात कोंडून घेतल्याने वडाळ्यात एका महिलेचा तर धारावीत एका पुरुषाचा मृत्यू झाला. कुर्ल्यात खुल्या तलावात पडून एकाचा तर चेंबूरमध्ये तेल रस्त्यावर सांडल्यामुळे दुचाकीस्वाराचा अपघातात मृत्यू झाला.































































