धोका कायम! मुंबईत सापडला चौथा ‘कोरोना’ संशयित रुग्ण!

1444

चीन-हाँगकाँगसह काही देशांमध्ये घबराट पसरवणाऱया जिवघेण्या ‘कोरोना’ व्हायरसचा चौथा संशयित रुग्ण मुंबईत आढळल्यामुळे धोका कायम असल्याचे समोर आले आहे. या 36 वर्षीय रुग्णावर सध्या पालिकेच्या कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू असून त्याची प्रकृती सुधारत असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली. दरम्यान, शुक्रवारपर्यंत आढळलेल्या तीनही ‘कोरोना’ संशयितांचे ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आले असून चौथ्या संशयिताचे ‘ब्लड सॅम्पल’ तपासणीसाठी नॅशनल इन्स्टिटय़ूट ऑफ क्हायरोलॉजी, पुणे येथे पाठवण्यात आल्याचे सांगण्यात आले.

चीन-हाँगकाँगसह काही देशांमध्ये गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’ व्हायरसने अनेकांचा जीव घेतला आहे. चीनमध्ये कोरोना बळींची संख्या 41च्या वर गेली आहे. यातच चीनमधून हिंदुस्थानात परत आलेल्या प्रवाशांमध्ये मुंबईचे तीन प्रवासी ‘कोरोना’ संशयित आढळल्याने घबराट पसरली होती. मात्र सुदैवाने तिघांचेही ब्लड रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. दरम्यान, चौथा ‘कोरोना’ संशयित हा चीनमधील वूहान शहरातून आल्याचे समोर आले आहे. ही व्यक्ती चीनमध्ये 3 ते 11 जानेवारी या कालावधीत वास्तव्याला होती. 11 जानेवारी रोजी ते व्हाया हाँगकाँग मुंबईत आले. मात्र आल्यानंतर त्यांना सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू होता. नियमित औषधोपचार करूनही हा त्रास कमी झाला नसल्यामुळे संबंधित रुग्ण ‘कोरोना’ संशयित असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांना कस्तुरबा रुग्णालयात दाखल करून घेण्यात आले आहे. दरम्यान, आधी आढळलेल्या ‘कोरोना’ संशयितांचे ब्लड सॅम्पल रिपोर्ट निगेटिव्ह आले असले तरी राज्य सरकारच्या निर्देशानंतरच त्यांना डिस्चार्ज देण्याबाबत निर्णय घेण्यात येणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पालिकेच्या समित्यांचे दौरे तात्पुरते स्थगित

‘कोरोना’च्या धोक्यामुळे पालिकेच्या समित्यांचे देश-विदेशातील अभ्यास दौरे तात्पुरते स्थगित करण्यात आल्याची माहिती शिवसेनेकडून देण्यात आली. पालिकेच्या शिक्षण समितीचा अभ्यास दौरा उत्तराखंड-डेहराडून, सुधार समितीचा उटी-म्हैसूर, स्थापत्य समितीचा अंदमान, आरोग्य समितीचा दौरा चीनमधील शांघाय, महिला बालकल्याणचा केरळ. तर वृक्ष प्राधिकरणचा अभ्यास दौरा सिंगापूर येथे आयोजित करण्यात आला होता. जानेवारीअखेर आणि फेब्रुवारीमध्ये हे दौरे आयोजित करण्यात आले होते.

आपली प्रतिक्रिया द्या