मुंबई गोवा महामार्गावर मारुती ओमनी जळून खाक…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई गोवा महामार्गावर तळेरे वाघाचीवाडी फाट्यानजीक शितल नर्सरीजवळ मारूती ओमनी कारने अचानक पेट घेतल्याने बर्निंग कारचा थरार अनुभवायला मिळाला. ही मारूती ओमनी कार जळून खाक झाली असून सदर घटना साडेसह वाजल्याच्या नतंर घडली. चालकाने प्रसंगावधान बाळगून उडी मारल्याने मोठा अनर्थ टळला.

मुंबई गोवा महामार्गावरून खारेपाटण वरून तळेरेच्या दिशेने जात असताना चालक गोसावी, (रा. तळेरे) हे तळेरे वाघाच्यावाडी फाट्यानजीक शितल नर्सरी जवळ आले होते. त्यावेळी दुसऱ्या फोर व्हीलर कारने टोचन करून मारुती ओमनी कार आणत असताना कारने अचानक पेट घेतला. गाडीला अचानक आग लागल्याचे समजताच चालक गोसावी प्रसंगावधान बाळगून गाडीतून उतरले. यानतंर गाडीला लागलेल्या आगीने रौद्र रूप धारण केल्यानंतर पूर्ण कार जळून खाक झाली.

या घटनेची माहिती मिळताच तातडीने स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य करत गाडीला लागलेल्या आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र आगीने रौद्र रूप धारण केले असल्याने त्यावर नियंत्रण मिळवणे शक्य नव्हते. या दुर्घटनेत मारूती ओमनी कारचे मोठे नुकसान झाले असून यामुळे महामार्गावर काहीकाळ वाहतूक ठप्प झाली होती.