मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, रामवाडी ब्रिजवर खड्ड्यात गेल्याने विक्रमचे चाकच मोडले

मुंबई गोवा महामार्गाचे उत्कृष्ट काम केल्याबद्दल राज्य शासनाने अभियंतांचा नुकताच सत्कार केला होता. त्या नव्याने तयार करण्यात आलेल्या सिमेंट काँक्रीटच्या रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तर कोकणातून मुंबईकडे येणाऱ्या जुन्या रस्त्यावर तर मोठे आणि महाकाय खड्डे पडले आहेत.

पेण तालुक्यातील उचेडे येथील विक्रम चालक दिपक गावंड हे वडखळ वरून पेण येथे विक्रम क्रमांक MH -06-S – 6929 प्रवाशांना घेऊन येत असताना रामवाडी पुलावर असलेल्या मोठ्या खड्ड्यात विक्रम चे चाक आपटून जागीच मोडले. सुदैवाने या अपघातात प्रवासी बचावले. परंतु विक्रम प्रवासी वाहनाचे मात्र नुकसान झाले. खड्ड्यातून गाडी बाहेर काढून वाहतूक सुरळीत करण्यात करीता इतर प्रवाशांनी व वाहतूक पोलिसांनी दिपक गावंड यांची मदत केली.

खड्ड्यांमुळे प्रवासी वाहतूक अडचणीत

मुंबई गोवा महामार्गावर जागोजागी पडलेल्या भल्या मोठ्या खड्ड्यांमुळे प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांना आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. गाडी पंक्चर होणे, टायर फाटणे, शॉक अॅब्सॉर्बर व पाटे खराब होणे या गोष्टी नित्याच्या झाल्या आहेत. शासनाने 14 वर्षात मुंबई गोवा महामार्ग पूर्ण न करणाऱ्या ठेकेदार व अधिकाऱ्यांकडून दंड वसुली करून सदर रक्कम विक्रम इको चालक मालकांना द्यावी अशी मागणी विक्रम चालक-मालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष विजय पाटील यांनी यावेळी केली.