लघुशंका करताना ‘लकी’ला पळवले

903

मुंबईतील ग्रँट रोड येथे लॅब्राडोर जातीच्या एका सहा वर्षाच्या कुत्र्याला तो लघुशंका करत असताना पळवून नेल्याची घटना घडली आहे. लकी असे या कुत्र्याचे नाव असून या कुत्र्याचे मालक अशोक साहू यांनी याप्रकरणी डी.बी.मार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सायंकाळी अशोक साहू आपला कुत्रा लकी याला राजा राममोहन रॉय मार्गावर फिरायला घेऊन गेले होते. त्यावेळी लकीला लघुशंका आल्याने त्याने थोड्या वेळासाठी त्याच्या गळ्यातील पट्टा काढून त्याला सोडले. याच दरम्यान एका अज्ञात इसमाने साहू यांची नजर चुकून लकीला पळवले. लकीला पाहण्यासाठी साहू यांनी पाठ वळवली असता लकी त्यांना कुठेच दिसला नाही. त्यांना असे वाटले की लकी भटकला असेल, म्हणून त्यांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली. लकी स्वतःहून घरचा मार्ग शोधून तो घरी तर गेला नसेल ना, असे त्यांना वाटले असता त्यांनी घरी फोन करून याबाबत विचारले. लकीचा खूप शोध घेल्यानंतर त्यांनी प्राणीमित्र कार्यकर्त्या सोनाली वाघमारे आणि अल्फा फाउंडेशनच्या सीमा टंक यांना संपर्क करून पोलिसात तक्रार नोंदवली.

साहू यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, ‘पोलिसात तक्रार नोंदवण्याआधी मी पूर्ण दिवस लकीचा शोध घेत होतो. मी वेगवेगळ्या दुकानांत जाऊन दुकाबाहेरील सीसीटीव्ही कॅमेरातील फुटेज दाखवण्यास सांगितले. अनेक सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर शेवटी मला एका फुटेजमध्ये एक गुलाबी पठानी परिधान केलेली व्यक्ती लकीला घेऊन जाताना दिसली. मला खात्री आहे त्यानेच आमचा कुत्रा चोरला आहे.’

दरम्यान, डीबी मार्ग पोलीस ठाण्यातील एका अधिकाऱ्याने सांगितले आहे की, अशा प्रकारे पाळीव प्राणी चोरी होण्याचे प्रकार फारच कमी होतात. शहारत असे आणखीन प्रकार घडले आहेत की नाही याचा आम्ही शोध घेत आहोत.

आपली प्रतिक्रिया द्या