
ग्रँट रोड येथील नाना चौकात एका गगनचुंबी इमारतीला आज दुपारी भीषण आग लागली. मात्र, अग्निशमन दलाने अवघ्या दहा मिनिटांत ही आग आटोक्यात आणली. आगीत सुदैवाने कोणतीही जीवीतहानी झाली नाही. आगीत एक फ्लॅट संपूर्ण जळून खाक झाला.
नाना चौकातील ऑर्बिट हाइट या 40 मजली इमारतीला आज दुपारी 12 वाजून 10 मिनिटांनी भीषण आग लागली. इमातीच्या 26 व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 2603 ला ही आग लागली. आग लागताच इमारतीतील इलेक्ट्रिक वायरिंग, लाकडी फर्निचरने तात्काळ पेट घेतला. आग आणि धुराचे लोळ पसरल्याने रहिवासी तात्काळ इमारतीबाहेर पडले. यावेळी अग्निशमन दलाच्या जवानांना तात्काळ पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने 2 फायर इंजिन, 2 जम्बो वॉटर टँकरच्या सहाय्याने अवघ्या दहा मिनिटात ही आग आटोक्यात आणली.































































