मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त शोभायात्रांचे आयोजन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

हिंदू नववर्षाच्या पार्श्वभूमीवर, गुढीपाडव्यानिमित्त हिंदू संस्कृतीच्या परंपरा आणि वैभवाची जाणीव नवपिढीला करून देण्यासाठी मुंबईत ठिकठिकाणी पारंपरिक पद्धतीने शोभायात्रांचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईत ताडदेव, जोगेश्वरीत भव्य शोभायात्रा, तर मुंबादेवी मंदिरात चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

गुढीपाडव्यानिमित्त जोगेश्वरीत भव्य स्वागत यात्रा

ढोल ताशांचा व बँजोचा निनाद… पारंपरिक वेशातील स्त्री-पुरुषांची मांदियाळी… डोक्यांवरील शोभा वाढवणारे फेटे… महिला व पुरुषांची बाईक व गाडय़ांची रॅली… शोभा रथ… पालखी… कोळी नृत्य… आदिवासींचे तारपा नृत्य… अशा थाटामाटात हिंदू नववर्षारंभाच्या पार्श्वभूमीवर गुढीपाडव्यानिमित्त जोगेश्वरीत भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. या शोभायात्रेची आकर्षक चित्रफित तयार करण्याची स्पर्धा आयोजित करण्यात आली असून तीन विजेत्यांची निवड करण्यात येणार आहे. जोगेश्वरीचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार रवींद्र वायकर यांच्या मार्गदर्शनाखाली या शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे.

गुढीपाडव्यानिमित्त जोगेश्वरीत दरवर्षी शोभायात्रेचे आयोजन करण्यात येते. स्वागतयात्रा ज्या ज्या मार्गावरून जाणार आहेत, त्या सर्व ठिकाणी आकर्षक रांगोळय़ाही काढण्यात येणार आहेत. पीएमजीपी कॉलनी, पूनमनगर, अंधेरी (पूर्व) येथून सकाळी 7 वाजता शोभायात्रेस सुरुवात होणार आहे. ही शोभायात्रा म्हाडा कॉलनी (कोकणनगर), सर्वोदयनगर, शेरे-ए-पंजाब कॉलनी, गुरूद्वारा, आघाडीनगर, कांतीलाल पंपाऊंड, निर्माण पॅलेस, मेघवाडी पोलीस ठाणे (आयकर वसाहत), स्वामी विवेकानंद शाळा, शनि महात्मा रोड मेघवाडी (शाखा क्र. 77), बी. टी. रोड मार्ग जनशक्ती चौकीसमोरील रस्तामार्गे समर्थनगर, स्वप्नपूर्ती, ठाकूरनगर, महाराज भुवन, शाखा क्र. 78 (धोबीघाट), संजय गांधी नगर, जोगेश्वरी स्टेशन रोड, सुभाष रोड, मकरानी पाडा, बांद्रेकरवाडी, भवानी चौक, जेव्हीएलआर जंक्शन (आरटीओ ऑफिस) प्रतापनगर, रामवाडी, दत्तटेकडी, इच्छापूर्ती गणेश मंदिर येथे शोभायात्रेची समाप्ती करण्यात येणार आहे.

नाना चौकामध्ये हिंदू नववर्ष स्वागत वैभव यात्रा

दरवर्षीप्रमाणे यंदाही जय भवानी प्रतिष्ठानच्या वतीने ताडदेव-नाना चौकमध्ये भव्य हिंदू नववर्षाचे स्वागत वैभव यात्रेने करण्यात येणार आहे. हिंदू संस्कृतीच्या परंपरा व वैभवाची जाणीव नवपिढीला करून देण्यासाठी ही यात्रा ताडदेवमध्ये पारंपरिक पद्धतीने मोठय़ा आनंद आणि उत्साहाने साजरी केली जाते. या वैभव यात्रेचे आयोजन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेते अरुण दुधवडकर यांनी केले आहे.

वैभव यात्रेच्या निमित्ताने यात्रा मार्गावर ठिकठिकाणी गुढय़ा उभारण्यात येणार असून मार्गावरील देवळे, मंदिरे व चौकांत भव्य रांगोळय़ा काढण्यात येणार आहेत. धावती रांगोळी हे याचे वैशिष्टय़ आहे. भगव्या पताका आणि तोरणांनी सजलेल्या रस्त्यांवर हिंदू संस्कृतीदर्शक चित्ररथ तसेच लेझीम, ढोलकी, हलगी यांसारख्या पारंपरिक वाद्यांचा ताल घुमणार आहे. नमन, वारकरी पंथाची दिंडी, शिमग्याची पालखी, आदिवासी नृत्ये इत्यादी हिंदू वारसा जतन करणारे सांस्कृतिक कार्यक्रम या वेळी सादर करण्यात येणार आहेत. महिलादेखील पारंपरिक नऊवारी साडय़ा परिधान करून मोठय़ा संख्येने यात्रेत सहभागी होणार आहेत.

युद्धकला, मर्दानी खेळ

कोल्हापुरातील सुप्रसिद्ध प्राचीन युद्धकला आणि मर्दानी खेळ संस्था यांच्या वतीने तलवारबाजी, दांडपट्टा, भालाफेक, लाठीकाठी इत्यादी शिवकालीन शस्त्राच्या युद्धकलेची प्रात्यक्षिके कोल्हापूरच्या तरुण वीरांगना करून दाखवणार आहेत. या वेळी कोकणच्या सिंधुदुर्ग जिह्यातील प्रसिद्ध लोककला ‘रोंबाट’ तसेच हिंदुहृदयसम्राट माननीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 12 फुटी प्रतिमेचे दर्शन घडवण्यात येणार आहे. पारंपरिक वेशभूषा परिधान करून सहभागी झालेले हजारो आबालवृद्ध यांच्या उपस्थितीत या यात्रेचा शुभारंभ मुंबईचे शिल्पकार नाना शंकरशेठ यांनी नाना चौक येथे बांधलेल्या भवानी शंकर मंदिरापासून होणार असून यात्रेचा समारोप ताडदेव फिल्म सेंटर येथे होणार आहे.

श्री दत्तगुरू, विठ्ठल-रखुमाई, राधा-कृष्ण मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना

गुढीपाडव्यानिमित्त इच्छापूर्ती श्री गणेश मंदिरात ‘श्री दत्तगुरू’, ‘विठ्ठल-रखुमाई’ तसेच ‘राधा-कृष्ण’ मूर्तींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यानिमित्त महाप्रसादाची व्यवस्थाही करण्यात आली आहे. सायंकाळी 6.30 वाजता आक्षाक्ष दिव्यदृष्टी कलाकार प्रस्तुत भावगीत व भक्तिगीतांवर आधारित दिव्यांगांचा संगीतमय कार्यक्रम ‘प्रतिपदा भक्ती संध्या’ तसेच पालखी नाचवण्याच्या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकमान्य टिळक गणेश विसर्जन तलाव, श्यामनगर, जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोड येथे याचे आयोजन करण्यात आले आहे.

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 आयोजित हिंदू नववर्षानिमित्त 18 मार्चपासून मुंबई महापालिकेच्या सी आणि डी वॉर्डमधील सफाई कर्मचाऱयांच्या साहाय्याने दक्षिण मुंबईच्या सर्व शाखेच्या विभागात स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. या कामगांराचा शाखा क्र. 220 आणि शाखा क्र. 214 यांच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी विभागप्रमुख संतोष शिंदे, विभाग संघटिका युगंधरा साळेकर, उपविभागप्रमुख संपत ठाकूर, शिवाजी राणे, सुरेंद्र निगुडकर, शाखाप्रमुख बाळा अहिरेकर, वैभव मयेकर, नीलेश देवळेकर, प्रभाकर पाष्टे, सरिता तांबट, अपर्णा सावंत, हेमा शेट्टे, शोभा जगताप, शशिकला चव्हाण, शाखा संघटिका कल्पना भांबुर्डे, नयना देहरकर, मीना आंधाळे, माधुरी पेंढारी यांच्यासह शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडी आदी उपस्थित होते.