‘केदारनाथ’ चित्रपटाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । मुंबई

अभिनेता सुशांत सिंग राजपूत याचा आगामी चित्रपट ‘केदारनाथ’ या सिनेमाच्या प्रदर्शनाचा मार्ग मोकळा झाला आहे. हिंदू धर्मातील चार धामपैकी एक असलेल्या पवित्र केदारनाथ या नावाने हिंदू-मुस्लिम तरुण-तरुणीच्या प्रेमकथेवर आधारित सिनेमा प्रदर्शित करण्यात येऊ नये या मागणीसाठी हायकोर्टात दाखल करण्यात आलेली याचिका न्यायालयाने गुरुवारी फेटाळून लावली. हायकोर्टाच्या या निर्णयामुळे चित्रपट निर्मात्यांना दिलासा मिळाला आहे.

हिंदूंचे पवित्र स्थान असलेल्या ‘केदारनाथ’ या चित्रपटात अभिनेता सुशांत सिंग राजपूत आणि अभिनेत्री सारा खान हिची प्रमुख भूमिका आहे. या चित्रपटात केदारनाथच्या नावाने प्रेमकथा दाखविण्यात आली असून सेन्सॉर बोर्डाने या चित्रपटाचे पुन्हा परीक्षण करावे व तोपर्यंत चित्रपटाच्या प्रदर्शनाला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी करत ऍड. रमेशचंद्र मिश्रा आणि ऍड. प्रभाकर त्रिपाठी यांनी याचिका दाखल केली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर सुनावणी घेण्यात आली.