
मुंबईत बुधवारी दिवसभर कोसळलेल्या मुसळधार पावसाचे भयानक रूप मालाड-मालवणीमध्ये मध्यरात्रीच्या सुमारास दिसले. रात्री 11 वाजून 10 मिनिटांनी तीन मजल्यांची एक इमारात बाजूच्याच दुमजली इमारतीवर पत्त्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत तीनमजली इमारतीत राहणारे नऊ जण आणि दुमजली इमारतीमधील तीन अशा 12 जणांचा ढिगाऱयाखाली अडकल्याने मृत्यू झाला, तर 7 जण गंभीर जखमी झाले. जखमींवर पालिकेच्या कांदिवलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मालाड मालवणीमधील अब्दुल हमीद रोडवर कलेक्टर लँडवर ही तीन मजली इमारत बनवण्यात आली होती. तर शेजारीच एक मजली आणखी एक इमारत बनवण्यात आली होती. ही इमारत धोकादायक झाल्याने रहिवाशांकडून तक्रारीही करण्यात आल्या होत्या. मात्र या इमारतीत राहणाऱयांनी याकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिकांनी सांगितले. रात्री 11.10 वाजता ही इमारत दुमजली इमारतीवर कोसळली. यावेळी झालेल्या भयंकर आवाजाने परिसरातील रहिवाशांनी घटनास्थळी धाव घेतली. दुर्घटनेत संपूर्ण तीन मजल्यांची इमारत दुमजली इमारतीवर पडून 19 जण ढिगाऱयाखाली सापडल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे स्थानिकांनीही बचावकार्य सुरू केले. या दुर्घटनेची माहिती मिळताच तातडीने दाखल झालेल्या अग्निशमन दलाने बचावकार्य करून सात जणांना ढिगाऱयाखालून सुखरूप बाहेर काढले. मात्र या दुर्घटनेत 12 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला.
महापौरांनी बोलावली बैठक
मालाड दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी घटनास्थळाला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. मुंबईतील विविध प्राधिकरणांच्या अखत्यारीत येणाऱया धोकादायक इमारतींबाबत सर्व संबंधित प्रमुखांची बैठक घेतली होती. यावेळी धोकादायक इमारतींचा आढावा घेण्यात आला आहे. या प्रश्नाबाबत मंगळवार-बुधवारी संबंधित प्राधिकरणांची पुन्हा बैठक घेऊन ठोस निर्णय घेण्यासाठी चर्चा करण्यात येईल, अशी माहिती महापौर किशोरी पेडणेकर यांनी यावेळी दिली. कोरोना काळात झालेल्या विविध प्राधिकरणांच्या जागेवर झालेल्या बेकायदा बांधकामांबाबतही यावेळी चर्चा होणार असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी मुंबई शहरचे पालकमंत्री अस्लम शेख, उपमहापौर अॅड. सुहास वाडकर, विभागप्रमुख सुधाकर सुर्वे आदी उपस्थित होते.
धोकादायक इमारती रिकाम्या करण्याच्या कारवाईला वेग
पालिकेच्या एफ/उत्तर प्रभागातील जीटीबीनगर येथील अतिधोकादायक इमारती पालिकेच्या माध्यमातून रिकाम्या करण्याच्या कारवाईला आता वेग आला आहे. या ठिकाणच्या 25 इमारतींमधील 24 नंबरची इमारत आज रिकामी करण्यात आली.
पालिकेच्या एफ/उत्तर विभागातील कलेक्टर लँडवर अतिधोकादायक असलेल्या इमारती पालिकेच्या माध्यमातून रिकाम्या करण्यात येत आहेत. या ठिकाणी अजूनही अकराशेवर जास्त कुटुंबे या 24 इमारतींमध्ये धोकादायकरीत्या राहत असल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. अतिधोकादायक ठरवल्यापासून पालिकेकडून या इमारती रिकाम्या करण्याची कारवाई केली जाते. वीज-पाणी तोडण्यात येते. गेल्या वर्षीही ही कारवाई करण्यात आली. मात्र अनेक रहिवासी अतिधोकादयक इमारतीत पुन्हा येऊन राहत आहेत. दरम्यान, आज कारवाई करण्यात आलेली इमारत पत्रे लावून सील करण्यात आली आहे. ही कारवाई आगामी काळात आणखी वेगाने करण्यात येत असल्याचेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.
मृतांची नावे
1) साहिल सर्फराज सय्यद (9)
2) शफिक सलीम सिद्धिकी (45)
3) तौसिफ शफिक सिद्धिकी (15)
4) तहेस शफिक सिद्धीकी (12)
5) जॉन इराणा (13)
6) अरिफा शेख (8)
7) अलिशा शफिक सिद्धीकी (10)
8) अल्फीसा शफिक सिद्धीकी (1.5 वर्षे)
9) अफिना शफिक सिद्धीकी (6)
10) इशरत बानो शफिक सिद्धीकी (40)
11) रईसा बानो रफिक सिद्धीकी (40)
12) अनोळखी व्यक्ती (60)
जखमींची नावे
1) मारीकुमारी हिरगंगा (30)
2) धनलक्ष्मी बेबी (56)
3) सलीम शेख (49)
4) रीजवान सय्यद (33)
5) सूर्यामनी यादव (39)
6) करीम खान (30)
7) गुलजार अहमद अन्सारी (26)
दूध आणायला गेला म्हणून रफिक वाचला!
कोसळलेल्या इमारतीत राहणारा रफिक शेख रात्री 11 वाजण्याच्या सुमारास जवळच्याच दुकानात दूध आणायला गेला होता. त्यामुळे सुदैवाने तो या दुर्घटनेतून वाचला. मात्र संपूर्ण कुटुंब या दुर्घटनेत मृत्य पावले. दुसऱया घरातील चांदबीबी रुक्साना घराबाहेर गेल्याने वाचल्या, मात्र त्यांचे दोन मुलगे आणि पती जखमी झाले.
संसार उद्ध्वस्त झाला
कोसळलेल्या इमारतीचा मोठा फटका बाजूच्या घरालाही बसला. ढिगारा आपल्या घरावर कोसळल्याने घरातील सर्व वस्तूंचे नुकसान झाल्याचे वृद्धा काwशल्या बोरुडे यांनी सांगितले. आपल्याला व नवऱयाला किरकोळ मार लागल्याचेही सांगताना आपल्याला मदत मिळावी असे आवाहनही त्यांनी केले.
राज्य सरकारची पाच लाखांची मदतीची घोषणा
मृतांच्या वारसांना राज्य सरकारकडून प्रत्येकी पाच लाख रुपयांची आर्थिक मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली. बुधवारी रात्रीच दुर्घटनेची माहिती मिळताच पालिका आयुक्तांशी चर्चा केली. तसेच मदत व बचावकार्य काळजीपूर्वक पार पाडण्याचे निर्देश दिले. अग्निशमन दल, महानगरपालिकेची पथके, पोलीस हे रात्रीपासून बचावकार्य करीत होते. मुख्यमंत्र्यांनी या दुर्घटनेतील जखमींवर तातडीने रुग्णालयांत हलवून शासनाच्या खर्चाने उपचार करावेत हे निर्देशही दिले
केंद्राकडूनही मदत
मृतांच्या वारसांना पेंद्राकडून प्रत्येकी 2 लाख रुपयांच्या आर्थिक मदतीची घोषणा जाहीर करण्यात आली आहे. तर जखमींना प्रत्येकी 50 हजारांची मदतही जाहीर करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. याबाबत ‘पीएमओ’ कार्यालयाकडून ट्विट करण्यात आले आहे.
दहिसर येथेही तीन घरे कोसळली, एक ठार
दहिसर पूर्व केतकीपाडा येथील शंकर टेकडी परिसरातील तीन घरे सायंकाळी 6.30 वाजताच्या सुमारास कोसळल्याची घटना घडली. मुसळधार पाऊस सुरू असताना घडलेल्या या दुर्घटनेत ढिगाऱयाखाली अडकलेल्या 8 जणांची पालिकेचे अग्निशमन दल आणि स्थानिकांनी सुटका केली. मात्र ढिगाऱयाखाली अडकलेल्या प्रद्युम्न सरोज (26) यांचा मृत्यू झाल्याची माहिती शिवसेना नगरसेवक बाळकृष्ण ब्रिद यांनी दिली. ढिगारा हटवण्याचे काम रात्री उशिरापर्यंत सुरू होते.































































