
रेल्वे मार्गावर अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना 8 लाखांची भरपाई मंजूर करीत मुंबई उच्च न्यायालयाने पश्चिम रेल्वे प्रशासनाला मोठा दणका दिला. रेल्वे रुळ ओलांडताना झालेला मृत्यू हा ‘अप्रिय घटना’ नसल्याचा दावा रेल्वे प्रशासनाने केला होता. तो दावा उच्च न्यायालयाने फेटाळला आणि अपघाती मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या कुटुंबियांना भरपाई मंजूर केली.
पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणारे व्हॅलेंटाईन डिसोझा यांचा अपघाती मृत्यू 18 मार्च 2011 रोजी झाला. डिसोझा हे कामावर जाण्यासाठी नायगाव रेल्वे स्थानकावर गेले होते. त्यानंतर नायगाव आणि भाईंदरदरम्यान त्यांचा मृतदेह आढळून आला. रेल्वे दावा न्यायाधिकरणाने त्यांच्या कुटुंबियांना भरपाई मंजूर करण्यास नकार दिला होता. डिसोझा यांना रुळ ओलांडत असताना रेल्वेने धडक दिली असावी. त्यामुळे ही ‘अप्रिय घटना’ ठरत नाही, असे निरिक्षण रेल्वे दावा न्यायाधिकरणाने नोंदवले होते आणि डिसोझा यांच्या कुटुंबियांना भरपाईचा दिलासा नाकारला होता. त्या निर्णयाविरोधात डिसोझा यांच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती.
डिसोझा यांच्या कुटुंबियांच्या याचिकेवर न्यायालयाने सविस्तर सुनावणी घेऊन निर्णय दिला. घटनेचा कोणताही प्रत्यक्षदर्शी नव्हता. त्यामुळे मृत व्यक्ती रुळ ओलांडत होती हे सिद्ध करण्यासाठी रेल्वेकडे कोणताही पुरावा नाही. मृताकडे रेल्वेच्या ‘प्रथम श्रेणी’चा पास होता. त्यामुळे संबंधित प्रवासी वैध प्रवासी असल्याचे सिद्ध झाले. जर एखाद्या व्यक्तीला रेल्वेची धडक बसली असती, तर मोटरमन किंवा गार्डने पुढील स्टेशन मास्तरला याची माहिती दिली असती. मात्र, या प्रकरणात अशी कोणतीही माहिती उपलब्ध नव्हती, या सर्व वस्तुस्थितीची नोंद करीत न्यायालयाने मृत व्यक्तीच्या कुटुंबियांना 8 लाख रुपयांची भरपाई मंजूर केली. याचवेळी रेल्वे दावा न्यायाधिकरणाचा जुना निर्णय रद्द केला. डिसोझा कुटुंबियांना 12 आठवड्यांच्या आत भरपाईची रक्कम द्यावी, असे आदेश न्यायालयाने पश्चिम रेल्वे प्रशासनाला दिले आहेत.



























































