कबूतरांना खाद्य घालणाऱयांवर गुन्हे दाखल करा, हायकोर्टाचे प्रशासनाला आदेश

दादर येथील कबूतरखान्यात पक्ष्यांना कोणतेही खाद्य घालू नये असे न्यायालयाने आदेश देऊनही त्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी हायकोर्टाने आज तीव्र नाराजी व्यक्त केली. कबूतरांची पिसे, विष्ठा मानवी आरोग्यास धोकादायक असतानाही लोकांनी न्यायालयीन आदेश धुडकावत कबूतरांना खाद्य घातलेच कसे, असा सवाल करत पालिका प्रशासनाला जाब विचारला तसेच संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश हायकोर्टाने पालिकेला दिले.

कबूतरांच्या विष्ठेमुळे आणि पिसांमुळे आरोग्याला गंभीर धोका निर्माण होत असल्याचे कारण देत पालिकेला शहरातील कबूतरखाना बंद करण्याचे निर्देश सरकारने दिले होते. मात्र कबूतरांना खायला घालण्यास बंदी घातल्याने त्यांचा मृत्यू होत असल्याने खाद्य घालण्यापासून रोखू नये, अशी मागणी करत पल्लवी पाटील यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली. या याचिकेवर आज बुधवारी न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी बंदी असतानाही कबूतरांना खायला दिले जात असल्याचे न्यायालयाच्या निदर्शनास आले. खंडपीठाने याची गंभीर दखल घेत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पालिकेच्या वतीने अॅड. रूपाली अधाते यांनी, तर राज्य सरकारच्या वतीने अॅड. मानकुवर देशमुख यांनी बाजू मांडली. दरम्यान, न्यायालयाने दिलेले अंतरिम आदेश कायम ठेवत फौजदारी कारवाईचा अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

 

View this post on Instagram

 

A post shared by Saamana (@saamana_online)

न्यायालय काय म्हणाले?

  • कबूतरखान्यातील कबूतरांच्या समूहामुळे नागरिकांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला आहे. असे असतानाही काही व्यक्तींनी बेकायदेशीरपणे कबूतरांना खाद्य देणे सुरू ठेवले आहे.
  • जनतेला कबूतरांचा त्रास होणार नाही याची पालिकेने काळजी घ्यावी.
  • न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या तसेच जीवघेणा आजार पसरवण्यास हातभार लावणाऱया नागरिकांविरोधात गुन्हा दाखल करा.