
केवढं हे प्रदूषण, पाचशे मीटरच्या पुढचे काहीच दिसत नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने मुंबईच्या प्रदूषणावर चिंता व्यक्त केली. मुंबईच्या प्रदूषणावर कायमस्वरुपी तोडगा हवा, असेही न्यायालयाने नमूद केले.
मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्या. गौतम अनखड यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली. दिल्लीच्या प्रदूषणावर काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. त्याचा नेमका काय परिणाम होतोय याचा आढावा घेऊन मुंबईचे प्रदूषण रोखायला आखणी करायला हवी, असे न्यायालयाने स्पष्ट केले. इथोपिया येथे ज्वालामुखीचा उद्रेक झाला आहे. तेथील राख हवेत मिसळली आहे. याने मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून प्रदूषण वाढले आहे, असे सरकारी वकील ज्योती चव्हाण यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणले.
मात्र असे काही नाही. काही दिवसांच्या आधीपासून मुंबईत प्रदूषण आहे. पाचशे मीटरच्या पुढचे काही दिसत नाही अशी परिस्थिती सध्या आहे, असे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर यांनी सांगितले. या मुद्दय़ावर आम्ही शुक्रवारी सुनावणी घेऊ, असे सांगत खंडपीठाने ही सुनावणी तहकूब केली.
काय आहे प्रकरण
मुंबईच्या प्रदुषणाचा मुद्दा 2023 मध्ये स्युमोटो जनहित याचिका म्हणून सुनावणीसाठी दाखल करून घेतला आहे. महापालिकेने प्रदूषण रोखण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत. तरीही गेल्या काही दिवसांपासून मुंबईच्या प्रदूषणात वाढ झाली आहे. यावर तातडीने सुनावणी घ्यावी, अशी विनंती वरीष्ठ डरायस खंबाटा यांनी केली. तसेच कांदिवली व उल्हासनगर येथील प्रदूषणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिले होते. हा अहवाल सादर झालेला नाही, असेही अॅड. खंबाटा यांनी न्यायालयाला सांगितले.
उत्तर सादर करा
प्रदुषणाच्या सर्व मुद्दय़ांवर आम्ही शुक्रवारी सुनावणी घेऊ. राज्य शासन, महापालिका व प्रदूषण नियंत्रण मंडळाने यावर म्हणणे सादर करावे, असेही न्यायालयाने नमूद केले.





























































