
सामना प्रतिनिधी। मुंबई
दुष्काळी परिस्थिती असतानाही केवळ चार महिन्यांत राज्यात तब्बल 90 लाख मेट्रिक टन साखरेचे विक्रमी उत्पादन झाले. पाणीटंचाईमुळे यंदा साखरेचे उत्पादन घटेल असे ठोकताळे सरकारी पातळीवर बांधले जात होते, मात्र सर्व अंदाज फोल ठरले असून 198 सहकारी आणि खासगी कारखान्यांनी 814 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून साखर उत्पादनाचा मोठा टप्पा गाठला. तसेच पुढील महिनाभर कारखाने पूर्ण क्षमतेने चालणार असल्याने मागील वर्षीचे 107 लाख मेट्रिक टनांचे रेकॉर्ड मोडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
राज्यातील सुमारे 190 साखर कारखान्यांनी 2017-18 च्या ऊस गाळप हंगामात एक हजार 50 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून प्रथमच 107 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते, मात्र चालू वर्षी राज्यात दुष्काळी परिस्थिती असल्याने साखरेचे उत्पादन कमी होईल असा अंदाज होता परंतु तो फोल ठरला.
106 सहकारी आणि 93 खासगी साखर कारखान्यांनी 20 ऑक्टोबरपासून गाळप हंगामाला सुरुवात केली होती. त्यानुसार आतापर्यंत 814 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 90 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले.
मागील वर्षी याच काळात 185 कारखान्यांनी 750 लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करून 82 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन केले होते.
पुढील काळात 16-17 लाख मेट्रिक टन साखरेचे उत्पादन झाल्यास आतापर्यंतचा साखर उत्पादनाचा उच्चांक ठरणार आहे.
कोल्हापूरच्या उसात सर्वाधिक साखर
आतापर्यंत सर्वाधिक साखरेचे उत्पादन पुणे, सातारा, सोलापूर विभागातून झाले असून ते 35 लाख मेट्रिक टन आहे, मात्र कोल्हापूर विभागातील उसामध्ये सर्वाधिक 12.16 टक्के एवढे साखरेचे प्रमाण आहे. त्याखालोखाल नगर विभागातील उसात साखरेचे प्रमाण 10.80 टक्के एवढे आहे.
































































