
सामना प्रतिनिधी । मुंबई
यंदा म्हणजेच सलग दुसऱया वर्षी राज्याच्या बारावीच्या निकालात घट झाली आहे. ही घट केवळ एकूण निकालात नसून नऊ विभागीय मंडळांसह कला, वाणिज्य, विज्ञान आणि व्यवसाय अभ्यासक्रमाच्या निकालाचीही ‘घसरगुंडी’ पहायला मिळाली. याचा परिणाम नव्वदीपार गुण मिळविणाऱया विद्यार्थीसंख्येवर झाला असून या विद्यार्थ्यांची संख्या 1 हजार 16 ने कमी आहे. मात्र कोकण विभागाची ‘सर्वोच्च’ निकालाची परंपरा तसेच मुलींचेच वर्चस्व यंदादेखील कायम आहे.
मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 7.85 टक्क्यांनी जास्त
मुलांपेक्षा मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण यंदादेखील कायम आहे. यंदाही मुलांपेक्षा तब्बल 7.85 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. 7 लाख 91 हजार 682 मुले तर 6 लाख 30 हजार 254 मुली परीक्षेला बसल्या होत्या. यांपैकी अनुक्रमे 6 लाख 52 हजार 379 मुले तर 5 लाख 68 हजार 780 मुली उत्तीर्ण झाल्या. मुलामुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी अनुक्रमे 82.40 आणि 90.25 अशी आहे.
































































