प्रत्यक्ष उपस्थित न राहताही शेकडो विद्यार्थ्यांना पदवी प्रदान

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पवईच्या आयआयटी मुंबईचा 58 का पदवीदान सोहळा आज ‘व्हर्च्युअल रिऑलिटी’ या अद्ययावत पद्धतीने पार पडला. प्रत्यक्ष उपस्थित न राहताही यावेळी विद्यार्थ्यांनी पदवी स्वीकारत असल्याचे प्रत्यक्ष पाहिले. ऑनिमेशन पद्धतीने त्याचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. त्यात मुख्य अतिथी, संचालक डॉ. सुभाशिष चौधरी आणि पदवी स्वीकारणाऱया विद्यार्थ्यांचा ऑनिमेटेड अवतार पहायला मिळाला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने आपला पदवीदान सोहळाही ‘हाय-टेक’ पद्धतीने साजरा करण्याचे ठरकले होते. देशातील अशा पद्धतीचा हा पहिलाच पदवीदान सोहळा होता. 2016 चे भौतिकशास्त्राचे नोबल विजेते आणि प्रिन्सटन विद्यापीठाचे प्राध्यापक डंकन हाल्देन हे या पदवीदान सोहळ्याचे मुख्य अतिथी होते. तर ब्लॅकस्टोन कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टीफन शेकरझमॅन हे या कार्यक्रमाचे सन्माननीय अतिथी होते.

आयआयटीच्या अधिकृत संकेतस्थळावर आणि सोशल मिडिया पेजेसवरही हा सोहळा थेट पाहता आला. ‘व्हर्च्युअल रिऑलिटी’ हा विद्यार्थ्यांसाठी एक वेगळाच अनुभव होता. आज पदवी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांमध्ये पीएचडीचे 381, दुहेरी पदवीचे 45 विद्यार्थी होते. त्याचप्रमाणे 39 संशोधकांचाही यावेळी विशेष गौरव करण्यात आला. पदवीदानावेळी प्रत्येक विद्यार्थ्याचे छायाचित्र आणि नाव प्रक्षेपित केले गेले. पदवीदानानंतर संस्थेच्या कॅम्पसची व्हर्च्युअल टूरही दाखवण्यात आली.