
रेल्वेच्या तिकीट तपासनीसांना फुकटय़ा प्रवाशांकडून होत असलेल्या मारहाणीमुळे सेंट्रल रेल्वे मजदूर संघाने उद्या शुक्रवारी मध्य रेल्वेच्या सीएसएमटी स्थानकाजवळील विभागीय रेल्वे कार्यालयासमोर निदर्शने करण्याचा इशारा दिला आहे. गेल्या दोन दिवसांत टीसींवर हल्ला केल्याच्या तीन घटना घडल्या आहेत. अंबरनाथ रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस नम्रता शेंडगे यांनी प्रवासी मीनल घुले यांना तिकीट विचारले असता बाचाबाची होऊन नम्रता यांना मारहाण केली. कल्याण लोहमार्ग पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून घुले याना अटक केली आहे. पश्चिम रेल्वेवरील वांद्रे रेल्वे स्थानकात तिकीट तपासनीस विवेक कुमार राय यांना एका अज्ञात प्रवाशाने ट्रकवर ढकलले. किंग्जसर्कल स्थानकात देखील तिकीट तपासनीस हरेराम शर्मा यांना दोघा विनातिकीट प्रवाशांनी बेदम मारहाण केली.

























































