
बोरिवलीला जाणाऱ्या लोकलमध्ये सेंकड क्लास डब्यातून प्रवास करताना धक्का लागल्याच्या कारणावरून एका महिलेला सहप्रवासी महिलेने जबर मारहाण केल्याचे समोर आले आहे. नजराना मनोज पिल्ले (35) असे मारहाण झालेल्या महिलेचे नाव आहे. तिने याविरोधात वांद्रे रेल्वे पोलिसात तक्रार दाखल केली आहे.

नजराना या सांताक्रुज येथील गोळीबार येथे राहतात. 16 सप्टेंबर रोजी त्यांनी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास लोअर परेल येथून बोरिवलीला जाणारी स्लो लोकल पकडली. ट्रेनमध्ये बरीच गर्दी असल्याने त्या दाटीवाटीत उभे राहून प्रवास करत होत्या. त्याचवेळी चुकुन त्यांचा शेजारी उभ्या असलेल्या एका महिलेला धक्का लागला. त्याचा राग आल्याने त्या महिलेने नजराना यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली व नजराणा यांच्या हाताला नखाने बोचकले व त्यांना धक्काबुक्की केली. यादरम्यान, गाडीने वेग घेतला होता. गाडी माटुंगा स्टेशनवर पोहचत असताना नजराणा यांनी तिला पोलिसात चल म्हणून सांगितले. त्यामुळे ती महिला अधिकच चवताळली व तिने नजराणा यांच्या बरगड्यावर ठोसा लगावत डाव्या हाताच्या दंडावर चावा घेतला. माहिम स्टेशन येईपर्यंत ती महिला नजराणा यांना शिवीगाळ करत होती. नंतर माहिम स्टेशन येताच ती गर्दीत पसार झाली.


























































