
कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनला हटविण्याच्या मोहिमेचा एक भाग म्हणून तब्बल 66 दिवसांनी पहिली परिवहन सेवा मुंबईत बेस्टच्या रूपाने सोमवारपासून सुरू होत आहे. बेस्टच्या या बसेसमध्ये सर्वसामान्य प्रवाशांना ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखून प्रवास करता येणार आहे. नेहमी घड्याळाच्या काट्यावर धावणारे मुंबईकर या बसेसमध्ये कसे चढतात आणि त्यांना शिस्त लावताना कंडक्टर आणि ड्रायव्हर यांची कसोटी लागणार आहे.
मुंबईकरांची दुसरी लाईफ लाईन म्हणून ओळखली जाणारी बेस्ट बस तब्बल दोन ते अडीच महिन्यांनंतर प्रवाशांच्या सेवेत दाखल होत आहेत. कोरोनाप्रसाराच्या पार्श्वभूमीवर जनजीवन पूर्वपदावर आणण्याचा एक भाग म्हणून खाजगी आणि शासकीय कार्यालयांना नियम पाळून सुरू करण्याची मूभा दिल्याने त्यांच्या सोयीकरिता या बस चालविण्याचे अवघड ‘शिवधनुष्य’ बेस्टला पेलावे लागणार आहे.
81 मार्गांवर 2100 बसेस
या बसेसमध्ये ‘सोशल डिस्टन्सिंग’ राखून दोन आसनांवर एकच प्रवासी आणि उभे पाच प्रवासी असे एका बसेसमध्ये 22 बसलेले आणि पाच उभ्या असे ड्राव्हयर व कंडक्टर जमेस धरल्यास एकूण 30 जणांना प्रवास करण्याची मुभा देण्यात येणार आहे. 65 वर्षांच्यावरील ज्येष्ठ नागरीकांना तसेच शालेय मुलांना प्रवेश देण्यात येणार नाही. उद्या पहिल्याच दिवशी मुंबई हद्दीच्या बाहेरचे विरार, पनवेल, बदलापूर अशा ‘एमएमआर’ रिजनच्या पाच जलद कॉरिडॉर रूटसह एकूण 81 मार्गांवर 2100 बसेस चालविण्यात येणार आहेत.
रेल्वेचे सगळे प्रवासी बसकडे वळणार
लॉकडाऊन खाजगी आणि शासकीय कार्यालयांना उघडण्याची मुभा मिळाल्याने त्यातच रेल्वेने लोकल चालविण्याचा निर्णय अद्यापही न घेतल्याने रेल्वेचे सारे प्रवासी बेस्टकडे वळणार आहेत. त्यामुळे पहिला काही दिवस गोंधळ उडण्याची शक्यता आहे. पाच रूपये तिकीट केल्यानंतर बेस्टची प्रवाशांची संख्या 30 लाख झाली होती. आता ती संख्या लाखभरावर आली आहे. दिवसाला 1 कोटी 69 ते 70 लाखाचे उत्पन्न मिळायचे ते आता 20 ते 22 लाखांवर आले. आता दहा टक्के प्रवासी उरले होते. त्यातील पोलीस, वैद्यकीय घटकांना मोफत प्रवास होता.
केवळ दहा टक्के बस उतरविणार
स्टेशन ते कॉलनी अशी एक बस दिवसाला 12 ते 15 फेर्या करते त्यामुळे जर 3000 हजार बस जर उतरविण्यात आल्या तर एकूण 40 ते 50 हजार फेर्या होतील. परंतू प्रशासन 2100 बसचे प्लानिंग केल्याचे सांगण्यात येते. म्हणजे केवळ दहा टक्के बसेस उतरविण्यात येण्याची योजना असल्याने गर्दी होण्याची शक्यता आहे.

































































