मुंबईकर दररोज घरबसल्या 6 कोटी रुपयांची अतिरिक्त वीज खातायत!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

लॉकडाऊनमुळे घरात बसलेले मुंबईकर दररोज तब्बल 6 कोटी रुपयांची अतिरिक्त वीज खात आहेत. एरवी उन्हाळय़ात 12-14 तास चालणारे एसी, पंखे, कूलर सध्या 24 तास सुसाट धावत आहेत. लॉकडाऊनमुळे सर्वचजण घरात बसलेले असतानाच तापमानाचा चढलेला पारा आणि वाढलेल्या उकाडय़ामुळे विजेचा दैनंदिन घरगुती वापर 30 दशलक्ष युनिटस्वरून 40 दशलक्ष युनिटस्पर्यंत पोहचला आहे. सर्वसाधारण वीज वापराच्या तुलनेत ही वाढ 10 दशलक्ष युनिटस्ची असून त्याची किंमत सहा कोटी 30 लाखांच्या घरात आहे.

उन्हाळय़ात सर्वकाही सुरळीत असताना मुंबईची दैनंदिन विजेची मागणी 65 दशलक्ष युनिटस्च्या घरात असते. मात्र सध्या लॉकडाऊनमुळे येथील औद्योगिक वीजवापर कमी झालेला असतानाच वाणिज्य ग्राहकांचा वीजवापर पूर्णतः ठप्प झाला आहे. त्यामुळे सध्या घरगुती वीज ग्राहकांची दैनंदिन विजेची मागणी 30 दशलक्ष युनिटस् तर अत्यावश्यक सेवा, रुग्णालये, रेल्वे आणि इतर उद्योगांची मागणी 20 दशलक्ष युनिटस् अशी एकूण 48-50 दशलक्ष युनिटस् असणे अपेक्षित होते. मात्र इतर घटकांची विजेची मागणी स्थिर असली तरी लॉकडाऊनमुळे मुंबईकर घरात बसून असल्यानेच विद्युत उपकरणांचा वापर वाढल्याने विजेच्या दैनंदिन मागणीत मोठी वाढ झाली असून ती 60 दशलक्ष युनिटस्पर्यंत पोहचली आहे. त्यामुळे पीक अवर नसतानाही सध्या मुंबईला सातत्याने 2400-2600 मेगावॅट वीज पुरवली जात आहे.

सर्वसामान्य परिस्थितीत सकाळी जास्त, दुपारी कमी आणि सायंकाळी जास्त असा मुंबईत विजेच्या मागणीचा ट्रेंड आहे. मात्र सध्या घरगुती ग्राहकांकडून सातत्याने वीज वापरली जात असल्याने विजेच्या मागणीचा ट्रेंड 2500 मेगावॅटच्या आसपास स्थिर आहे. – डॉ. अशोक पेंडसे, वीजतज्ञ

वाणिज्यिक ग्राहकांचा वीज वापर शून्य असतानाही मागणी स्थिर

लॉकडाऊनमुळे मुंबईतील मॉल, दुकाने, कार्यालये यांचा 15 दशलक्ष युनिटस् पर्यंतचा वीज वापर ठप्प आहे. त्यामुळे त्या प्रमाणात मुंबईची विजेची दैनंदिन मागणी कमी होणे अपेक्षित होते. मात्र घरगुती वीज ग्राहकांचा वीज वापर वाढल्याने सध्या विजेची एकूण मागणी स्थिर असल्याचे दिसत आहे.

वीज वापर

  •  25 मार्च – 59 दशलक्ष युनिट
  •  30 मार्च – 60.55 दशलक्ष युनिट
  •  15 एप्रिल – 57 दशलक्ष युनिट
  •  5 मे – 60 दशलक्ष युनिट
  •  6 मे – 60 दशलक्ष युनिट
  •  7 मे – 59.81 दशलक्ष युनिट