मुंबई-लंडन फ्लाइटचे 7 तास उशिराने उड्डाण; एअर इंडियाच्या विमानात तांत्रिक बिघाड, प्रवाशांना दीड तास विमानात बसवले

एअर इंडियाच्या मुंबई-लंडन फ्लाइटचे सात तास उशिराने उड्डाण करण्यात आले. शनिवारी सकाळी एअर इंडियाच्या एआय 129 या विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाल्यामुळे प्रवाशांना तब्बल 7 तास विमानतळावर ताटकळत बसण्याची वेळ आली. हे विमान सकाळी साडेसहा वाजता उड्डाण करणार होते. परंतु ते दुपारी 1 वाजता उड्डाण करण्यात आले. एअर इंडियाच्या गलथान कारभारामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला. सोशल मीडियावर एअर इंडियाविरोधात तक्रारींचा पाऊस पाडला.

मुंबईहून लंडनला जाण्यासाठी विमान प्रवाशांनी सकाळी चार-साडेचारच्या सुमारास घर सोडले. 5 वाजून 20 मिनिटाला बार्ंडगची वेळ देण्यात आली होती. परंतु या विमानाची बार्ंडग सकाळी 6 वाजता सुरू झाली. विमानात चढल्यानंतर एअर इंडियाच्या कर्मचाऱयांकडून कोणतीही माहिती देण्यात आली नाही. जवळपास दीड तास विमानात बसून राहिल्यानंतर एका क्रूने सांगितले की, विमानात तांत्रिक बिघाड झाला आहे, त्यामुळे प्रवाशांना खाली उतरावे लागेल, असे एका प्रवाशाने सांगितले. सकाळी सव्वाआठच्या सुमारास प्रवाशांना विमानातून खाली उतरवले. यानंतर पुन्हा हँडबॅगची तपासणी केली. प्रवाशांना आधी सांगितले की, दुपारी 12 वाजता विमानाचे उड्डाण होईल; परंतु नंतर वेळ बदलून दुपारी एक वाजेची वेळ देण्यात आली. अनेक प्रवाशांनी असाही दावा केला की, विमान कंपनीकडून त्यांना योग्य माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना नाहक त्रास सहन करावा लागला.

एअर इंडियाकडून स्पष्टीकरण

या सर्व प्रकाराबद्दल एअर इंडियाने स्पष्टीकरण दिले आहे. उड्डाणाला उशीर होण्यामागे विमानात तांत्रिक बिघाड होता. सर्व प्रवाशांना आवश्यक जलपान उपलब्ध करण्यात आले होते. विमान पंपनीकडून योग्य ती खबरदारी घेण्यात आली, असे एका अधिकाऱयाने सांगितले. तर दुसरीकडे विमान प्रवासी एअर इंडियाच्या सेवेवर नाराज दिसले. काही प्रवाशांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करून यासंबंधीची माहिती दिली.

गुरुवारी दिल्लीच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर झालेल्या तांत्रिक बिघाडाचा परिणाम मुंबई-लंडन फ्लाइटवर पडल्याचे दिसले. दिल्लीतील घटनेमुळे 800 हून अधिक विमानांच्या उड्डाणांना उशीर झाला होता.