मालाडमधून 50 लाखांचे एमडी जप्त

अमली पदार्थविरोधी कक्षाच्या आझाद मैदान युनिटने मालाड येथे कारवाई करून 50 लाख रुपयांचे एमडी जप्त केले. एमडीची विक्री करणाऱ्या सायरा खानला पोलिसांनी बेडय़ा ठोकल्या. ती गेल्या दोन वर्षांपासून एमडी विकत असल्याचे तपासात समोर आले आहे.

मालाड परिसरात एक महिला एमडी विकत असल्याची माहिती आझाद मैदान युनिटला मिळाली. पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांच्या मार्गदर्शनखाली प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय मसवेकर यांच्या पथकातील आढाव, इघे, भुजबळ, पवार, निंबाळकर, राठोड आदींच्या पथकाने तपास सुरू केला. तपासादरम्यान पोलिसांनी मालाडच्या चिंचोली बंदर परिसरात सापळा रचून सायराला ताब्यात घेतले. तिच्याकडून पोलिसांनी अर्धा किलो एमडी जप्त केले. जप्त केलेल्या एमडीची किंमत 50 लाख रुपये इतकी आहे. एमडी तस्करीप्रकरणी सायराविरोधात गुन्हा दाखल करून तिला अटक केली. तिला न्यायालयाने 2 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सायराचा पूर्वी वडापावचा धंदा होता. मात्र त्यात नुकसान झाल्याने ती ड्रग्जच्या धंद्यात आली.

आपली प्रतिक्रिया द्या