राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात पुस्तकाचे गाव – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

आज आपण ज्यांचा इथे सत्कार करतो आहोत. तो त्यांचा सत्कार नाही, तर तो एक छोटसं ऋण व्यक्त करण्याचा क्षण आहे. साहित्यिक म्हणजे महाराष्ट्राच्या भाषेचे, अक्षरधनाचे, मराठी संस्कृतीचे भाषा रक्षक आहेत. भाषा संवर्धक आहेत. पुरस्कार हे एक निमित्त आहे. त्यांचे हे ऋण व्यक्त करण्याचे कर्तव्य बजावताना मोठा अभिमान वाटतो, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

मराठी भाषा गौरव दिनाचे वेगवेगळे कार्यक्रम होत आहेत. त्यामध्ये मराठी भाषा सोपी करण्याचा विचार मांडत आलो आहे. म्हणजे ऑनलाईनला काय म्हणायचे इथपासून सुरवात होते. नवनवे तंत्रज्ज्ञान विकसित होत आहे. प्रत्येक दिवस नव नवीन गोष्टी घेऊन येत आहे. या स्पर्धात्मक युगात मराठी संस्कृती टिकणे, वाढवणे महत्वाचे आहे. त्यामुळे शासन म्हणून मराठी भाषेच्या संवर्धनाचे, विकासाचे वेगळे काम, प्रयत्न करत आहोत. असे प्रयत्न आणि मराठी भाषा गौरव दिन पुढच्या कित्येक पिढ्यांना साजरा करावा लागेल, आणि त्यामध्ये खंडही पडू दिला जाणार नाही, असे मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले.

मुख्यमंत्री म्हणून आल्यानंतर शासन व्यवहारातील व्यपगत, नियतव्य, नस्ती अशा शब्दांचे नवल वाटले असे नमूद करून मुख्यमंत्री म्हणाले, इंग्रजीतून थेट शब्दशः भाषांतर करण्यामुळे अनेक घोळ झाले आहेत. अर्थपूर्ण आणि सोपे शब्द व्यवहारत आले पाहिजेत यासाठी प्रय़त्न करावे लागतील. त्यासाठी तुम्ही सगळे साथ द्याल असा विश्वास आहे.

साहित्यिक केवळ लेखन करत नाहीत. तर ते आयुष्याची गाडी रुळावर ठेवतात असता उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, शिवसेनाप्रमुख म्हणत, एका एका अक्षरातून शब्द बनतो. मग त्या शब्दांचे मंत्रही होतात, ओव्याही होतात आणि शिव्याही हातात. ज्याच्या-त्याच्यावर भाषेचे कोणते संस्कार होतात, त्यातून त्याची भाषा विकसित होत असते. भाषा जपणे म्हणजे संस्कृतीचे जतन करणे. कारण नसताना आपण भाषेचा न्युनगंड बाळगतो. उत्तरेतून कुणी नेता इकडे आला की हिंदीतूनच बोलतो. पण आपण तिकडे गेलो, तर तो आपल्याशी मराठीतून बोलत नाही. परदेशात अनेक ठिकाणी इंग्रजी बोलली जात नाही. अनेक देशांचे अध्यक्षही इंग्रजी बोलत नाहीत ते त्यांच्या-त्यांच्या देशातील भाषेत बोलतात. त्यामुळे आपण आपल्या भाषेला कमी लेखतो का, याचा विचार करायला हवा.

छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन केले, ते संस्कृती रक्षक होते. त्यांनी मराठी भाषेचा पहिला शासन व्यवहार कोश तयार केला. आज आपण शासन म्हणून शासकीय व्यवहारात आपल्या मराठीतील सोपे शब्द वापरण्यात यावेत, असा आग्रह धरतो. सादरीकरणापासून ते अनेक गोष्टींत मराठीच असावी असे निर्देश दिले आहेत. मराठी भाषा मंत्री म्हणून सुभाष देसाई यांचाही यावर कटाक्ष असतो.

परदेशातील मराठी मंडळातही मराठी भाषेचे, मातृभूमीचे प्रेम आणि ओढ असल्याचे जाणवते. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ने मजसी ने परत मातृभूमीला या उक्तीप्रमाणे ही मंडळी मराठी भाषेवरील आपले प्रेम व्यक्त करण्याचा प्रय़त्न करत असतात. त्यासाठी कार्यक्रम, उपक्रमांचेही आयोजन केले जाते. यावेळी मुख्यमंत्र्यांनी फिलाडेल्फीया येथील अशाच एका कार्यक्रमास उपस्थित राहिल्याची आठवणही सांगितली.

मराठी भाषेचा जास्तीत जास्त वापर व्हावा. मराठी भाषेचा जागर व्हावा यासाठी पुस्तकाचं गाव उपक्रम सुरु केला आहे. त्यामध्ये राज्यात एकच पुस्तकाचं गाव का असावे? असे नमूद करून तळागाळातील मराठी भाषा, तिच्या वैशिष्ट्यांसह सर्वांपर्यंत पोहचावी यासाठी प्रय़त्न करतो. मग मराठी भाषेचा विकास तिथेपर्यंत पोहचविण्याचे प्रयत्न केले जातील. त्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात किमान एक पुस्तकाचे गाव असायला हवे. त्यासाठी पुढील मराठी भाषा गौरव दिनापुर्वी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात एक गाव पुस्तकांचे गाव असेल, अशी घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.

मुख्यमंत्र्यांचे वाचन, साहित्य प्रेम

भाषणात मुख्यमंत्री ठाकरे यांनी ओघवत्या शैलीत आपण वेळ मिळेल, त्यावेळी काही-ना-काही वाचत असतो असे नमूद करतानाच पु.ल. देशपांडे यांचे इंग्रजीतून मराठीत भाषांतरीत शब्दांची विसंगती, कवीवर्य वि.दा. करंदीकर यांच्या कविता शालेय जीवनात तोंडपाठ असल्याच्या आठवणी, कवी मंगेश पाडगांवकर यांच्याशी झालेला संवाद, कवी वा.रा. कांत यांची रुग्णालयातील भेट, कवयित्री शांता शेळके यांच्या म्हणी, ओव्या, लोकगीतांविषयीचे साहित्य, बहिणाबाईंची गाणी यांचाही आवर्जून उल्लेख केला. याबरोबरच प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या भाषणाच्या सीडीज् यांच्यासह अनेक पुस्तकांचा, विविध साहित्यकृतींच्या सीडीज् यांचा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्याला अमुल्य ठेवा दिल्याचा उल्लेख केला.