
मुंबईच्या महापौरपदी पुन्हा एकदा पालिकेतील सर्वात मोठा पक्ष असलेल्या शिवसेनेचाच उमेदवार निवडून येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. 22 नोव्हेंबर रोजी ही निवडणूक होणार असून यावेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण असल्याने इच्छुकांमध्ये प्रचंड चुरस निर्माण झाली आहे.
राज्यातील 27 महानगरपालिकांमधील महापौरपदाची पहिल्या अडीच वर्षांची मुदत 21 नोव्हेंबरला संपत असल्याने बुधवारी मंत्रालयातून आरक्षण जाहीर करण्यात आले. यामध्ये मुंबई महानगरपालिकेसाठी सलग दुसऱया वेळी खुल्या प्रवर्गाचे आरक्षण पडले. त्यामुळे पालिकेच्या सर्व 222 नगरसेवकांना महापौरपदासाठी अर्ज करण्याची संधी आहे.
गेल्या 25 वर्षांपासून मुंबई महानगरपालिकेवर निर्विवाद वर्चस्व असलेल्या शिवसेनेचे संख्याबळ सर्वाधिक असल्याने शिवसेनेचाच महापौर होणार असल्याचे स्पष्ट होत आहे. 22 नोव्हेंबरला होणाऱया या निवडणुकीसाठी 18 नोव्हेंबर सायंकाळी 6 वाजेपर्यंत इच्छुकांना संबंधित पालिकेच्या चिटणीस खात्याकडे अर्ज सादर करता येणार आहे.
सध्याचे संख्याबळ
एकूण नगरसेवक 222
शिवसेना 94
भाजप 83
काँग्रेस 28
राष्ट्रवादी 8
सपा 6
मनसे 1
एमआयएम 2
…म्हणूनच मिळाली मुदतवाढ
राज्यातील महापौरपदांची पहिल्या अडीच वर्षांची मुदत 15 सप्टेंबरला संपली. मात्र याच कालावधीत विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने मुंबईचे विद्यमान महापौर प्रिं. विश्वनाथ महाडेश्वर यांनाही राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडून तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली. ही वाढीव मुदत 21 नोव्हेंबर रोजी संपत आहे.



























































