भाजपची गटारी जोरात, काँग्रेस–राष्ट्रवादीतून मेगाभरती

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी। मुंबई

भाजपने बुधवारी राजकीय गटारी जोरात साजरी केली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस-राष्ट्रवादीतील नेत्यांची मेगाभरतीच भाजपमध्ये पार पडली. या मेगाभरतीचा सर्वाधिक फटका राष्ट्रवादीला बसला असून साताऱ्याचे आमदार शिवेंद्रराजे भोसले, अकोल्याचे आमदार वैभव पिचड यांच्यासह राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनीही भाजपची वाट धरली आहे. नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे आमदार संदीप नाईक यांच्यासह माजी महापौर सागर नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत चर्चगेटच्या गरवारे पॅव्हेलियन येथे पार पडलेल्या या सोहळ्यात भाजप प्रवेशाची वाट पाहणाऱया काँग्रेसचे आमदार कालिदास कोळंबकर यांचाही पक्ष प्रवेश अखेर पार पडला. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्या नेत्या चित्रा वाघ, महात्मा जोतिबा फुले यांच्या वंशज नीता होले यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या राजकारणात आपल्या कार्याने दबदबा निर्माण करणाऱया नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश होत आहे, ही आनंदाची बाब असल्याचे सांगितले. मधुकर पिचड यांच्या रूपाने दीर्घ अनुभवी नेता मिळाल्याचेही ते म्हणाले. तर मधुकर पिचड यांनी आपल्याला भाजपची वाट दाखविल्याबद्दल गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांचे आभार मानले.

वैभव पिचडांना पकडलं, मधुकर पिचड सापडले
नवी मुंबईचे संदीप नाईक आले आहेत. त्यामुळे त्यांना गणेश नाईक यांचा आशींर्वाद नक्की मिळेलच. आम्हीही हुशार आहोत. आम्ही राधाकृष्ण पाटील यांना घेतले नाही तर सुजय विखेंना आधी घेतलं. आम्ही वैभव पिचड यांना आधी पकडलं तर मधुकर पिचड आपोआप सापडलेच. विजयसिंह दादांचं तेच केलं, रणजितसिंह पाटील यांना भाजपमध्ये घेतलं आहे, अशी मिश्किल टिपणी मुख्यमंत्र्यांनी केली.

महाराष्ट्र दुष्काळमुक्त करणार
उद्यापासून महाजनादेश यात्रा सुरू करतोय. या यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेचा जनादेश हा युतीच्या पाठीशी आणण्याचं काम करू. येत्या काळात महाराष्ट्र-समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू. संपूर्ण महाराष्ट्र दुष्काळमुक्त करू. दुष्काळ हा आता भूतकाळ ठरेल. दुष्काळी भाग हा शिक्का मिटविण्यासाठी येत्या निवडणुकीत महाराष्ट्राच्या जनतेचा कौल घेऊ, असे मुख्यमंत्री म्हणाले.

धाक दाखवून पक्षात घेण्याचे दिवस आता राहिले नाहीत
भाजपकडून धाक दाखवून पक्षात घेतले जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती. याला मुख्यमंत्र्यांकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. मुख्यमंत्री म्हणाले, धाक दाखवून पक्षात घेण्याचे भाजपचे दिवस आता राहिलेले नाहीत. एक दिवस होता की भाजप लोकांच्या मागे फिरायचा, पण आज समाजातील चांगले नेते भाजपमध्ये येत आहेत, असे सांगतानाच भाजप ही काय धर्मशाळा नाही की कुणीही उठावं आणि पक्षात यावं. जनतेचा पक्ष जरूर आहे. पण पक्ष प्रवेश देताना नेत्यांचे कार्य, कर्तृत्व, समाजातील त्यांचं स्थान याचा आम्ही विचार करीत आहोत, असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला.