
मुंबईतील महत्त्वाकांक्षी कुलाबा-वांद्रे-सीप्झ ‘मेट्रो-3’ प्रकल्पाच्या भुयारीकरणाने आज 38 वा टप्पा यशस्वीरीत्या ओलांडला. कफ परेड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकापर्यंतचे भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले. ‘सूर्या-1’ या रॉबिन्स बनावटीच्या डय़ूएल मोड हार्ड रॉक टनेल बोअरिंग मशीनद्वारे हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या अप-लाइन मार्गाचे 557 मीटर भुयारीकरण 405 रिंग्जच्या सहाय्याने 149 दिवसांत पूर्ण करण्यात आले.
मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसी) ही माहिती दिली. मेट्रो-3 च्या एकूण सातपैकी सहा पॅकेजचे भुयारीकरण 100 टक्के पूर्ण झाले आहे. ऐतिहासिक वारसा असलेल्या इमारतींजवळून हे भुयारीकरण करणे म्हणजे आव्हान होते. परंतु अभियंते आणि कामगारांनी अत्यंत काैशल्यपूर्ण पद्धतीने ते पूर्ण केल,s अशी प्रतिक्रिया एमएमआरसीचे व्यवस्थापकीय संचालक रणजितसिंह देओल यांनी दिली. भुयारी मेट्रोच्या पॅकेज-1 मध्ये कफ परेड, विधान भवन, चर्चगेट आणि हुतात्मा चौक या स्थानकांचा समावेश आहे. मेट्रो-3 प्रकल्पाचे आतापर्यंत एकूण 52 किलोमीटर म्हणजेच 96 टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.


























































