
दक्षिण मुंबईला पश्चिम उपनगराशी जोडणाऱ्या मेट्रो-3 या भुयारी मेट्रो प्रकल्पाचे काम प्रगतिपथावर आहे. दक्षिणेकडील कफ परेड हे पहिले स्थानक असून त्या स्थानकाच्या बेस स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. बीकेसी स्थानकाचेही काम जवळजवळ 41 टक्के पूर्ण झाले असून त्या स्थानकात गाडय़ा उभ्या करण्यास तसेच वळवण्यासाठी दोन स्टेबलिंग लाइन्सही टाकण्यात आल्या आहेत. मिठी नदीखालून एक किलोमीटरपर्यंतचे भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
मुंबई मेट्रो रेल महामंडळाने (एमएमआरसीएल) आज कफ परेड आणि बीकेसी स्थानकात आतापर्यंत किती काम पूर्ण झाले हे प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दाखवले. कफ परेड येथे टनेल बोअरिंग मशीनद्वारे (टीबीएम) भुयारीकरण करण्यात येत आहे. या स्थानकाला दोन स्टेबलिंग लाइन्स तसेच 200 मीटर लांबीचे दोन बोगदे असणार आहेत. स्टेबलिंग लाइन्स एनएटीएम पद्धतीचा वापर करून बांधण्यात येत आहेत. त्यासाठी लागणारे खोदकाम पूर्ण झाले आहे. कफ परेड स्थानक जमिनीपासून 22 मीटर खोल असून त्याची लांबी 400 मीटर आहे. या स्थानकाच्या बेस स्लॅबचे काम पूर्ण झाले आहे. मेट्रो-3 च्या पॅकेज-1 अंतर्गत कफ परेडबरोबर विधान भवन, चर्चगेट, हुतात्मा चौक ही स्थानके येतात, अशी माहिती मुख्य प्रकल्प व्यवस्थापक राजेश मित्तल यांनी दिली.
बीकेसी येथील भुयारीकरण टीबीएम तसेच एनएटीएम पद्धतीचा वापर करून करण्यात येत आहे. या स्थानकासाठी मिठी नदीखालून भुयारीकरण करण्यात येत आहे. हे भुयारीकरण ‘अर्थ प्रेशर बॅलन्स’ पद्धतीच्या टीबीएमद्वारे तसेच काही भागांतील भुयारीकरण एनएटीएम पद्धतीने करण्यात येत आहे. एनएटीएमद्वारे बांधलेले बोगदे हे टीबीएमप्रमाणेच असतात. छोटय़ा एस्केव्हेटर्सचा वापर करून ब्लास्टिंगद्वारे मिठी नदीखाली बोगदे बनवण्यात येत आहेत. मिठी नदीखालून तीन बोगदे बांधण्यात येत असून दोन बोगदे टीबीएमद्वारे तर तिसरा 153 मीटर लांबीचा बोगदा एनएटीएमद्वारे बांधण्यात येत आहे. हे स्थानक 18 मीटर खोल आणि 474 मीटर लांब आहे.
मेट्रो-3 मार्गावरील विधान भवन, सिद्धिविनायक, मरोळ नाका आणि एमआयडीसी या स्थानकांचे काम 60 टक्क्यांपेक्षा जास्त पूर्ण झाले आहे. कफ परेडसह सीएसएमटी, विद्यानगरी, सांताक्रुझ, सीएसआयए (डी), सहार रोड आणि सीप्झ या स्थानकांचे 50 टक्क्यांपेक्षा जास्त काम पूर्ण झाले आहे.
उत्तम फ्रिक्वेन्सीसाठी बीकेसी स्थानकात तीन मार्ग
कफ परेड ते बीकेसीदरम्यान जास्त गाडय़ा धावणार आहेत. गर्दीच्या वेळी त्या गाडय़ांची फ्रिक्वेन्सी चांगली राहावी यासाठी बीकेसी स्थानकात तीन मार्ग बनवण्यात आले आहेत. गाडय़ांमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास त्या गाडय़ा या तिसऱया लाइनवर उभ्या करता येऊ शकतील.






























































