
मुंबईत मेट्रो रेल्वेचे अनेक मार्ग आहेत. कोणती मेट्रो कुठे धावते हे रंगांवरून ओळखता येणार आहे. प्रत्येक मेट्रो लाइनला स्वतंत्र रंग देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रवाशांना मेट्रोची माहिती सहजगत्या कळू शकणार आहे. मेट्रो-7 आणि मेट्रो-2ए हे मार्ग लाल आणि पिवळय़ा रंगांनी ओळखता येणार आहेत.
मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे (एमएमआरडीए) आयुक्त आर. ए. राजीव यांनी नुकतेच मेट्रोची डिझाईन्स आणि चिन्हांचे अनावरण केले. मेट्रो स्थानकांवरील चिन्हांची पार्श्वभूमी काळय़ा रंगाची असणार आहे. चिन्हांची डिझाइन्स ‘सिस्त्रा’ या कंपनीने बनवली आहेत. मेट्रो दि पॅरीस, फ्रेंच नॅशनल रेल्वे स्थानक, मेट्रो दि मार्सिली आणि अल्जायर मेट्रो या स्थानकांवरील चिन्हांचे डिझाइन सिस्त्रानेच बनवले आहे.
मेट्रो-7 हा मार्ग दहिसर पूर्व ते अंधेरी पूर्व असा आहे, तर मेट्रो-2ए हा मार्ग दहिसर ते डी. एन. नगर असा आहे. येत्या डिसेंबरपासून हे दोन्ही मार्ग प्रवाशांसाठी खुले केले जाणार आहेत. इतर मेट्रो लाइन्ससाठीही स्वतंत्र रंगांची निवड एमएमआरडीए करत आहे. आयुक्त राजीव यांनी मेट्रो आणि मोनो रेलसाठी देण्यात येणाऱया संयुक्त कार्डाचेही अनावरण केले.
- प्रत्येक स्थानकात आत आणि बाहेर जाण्याच्या मार्गावर वेगवेगळी चिन्हे असणार आहेत.
- जिथे दोन किंवा अधिक मार्ग एकत्र येणार आहेत तिथे विविध रंगांची चिन्हे असणार आहेत.
- मेट्रो-7 मार्गावरील बाणडोंगरी स्थानकातून ही चिन्हे बनवण्यास येत्या दोन-तीन आठवडय़ांत सुरुवात होणार आहे.





























































