शिवसेनेच्या दणक्यानंतर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन ताळ्यावर, मेट्रो स्थानकातील ‘घुसखोरी’चे फलक हटवले!

कोटय़वधीच्या कमाईसाठी भुयारी मेट्रो स्थानकांच्या नावांमध्ये जाहिरातदारांची नावे घुसवणारे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन शिवसेनेच्या दणक्यानंतर ताळ्यावर आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावे असलेल्या मेट्रो स्थानकाच्या नामफलकामध्ये जाहिरातदारांची घुसखोरी केली होती. त्याविरोधात शिवसेनेने तीव्र आंदोलन केले आणि स्थानकाच्या नावातील जाहिरातदाराचे नाव तत्काळ हटवण्याची मागणी केली होती. त्या आंदोलनामुळे हादरलेल्या मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने जाहिरातदारांच्या ‘घुसखोरी’चे फलक हटवले आहेत.

भुयारी मेट्रोचा वरळी सायन्स म्युझियम ते कफ परेडपर्यंतचा टप्पा लवकरच प्रवासी सेवेत खुला केला जाणार आहे. त्याच्या उद्घाटनाआधी स्थानकांची नावे जाहिरातदारांच्या घशात घालण्यात आलीत. मेट्रो प्रशासन आणि महायुती सरकारने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, हुतात्मा स्मारक चौक या मेट्रो स्थानकांच्या नावामध्येही जाहिरातदारांची नावे घुसवली. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाचे ‘कोटक’ छत्रपती शिवाजी महाराज स्थानक असे नामकरण केले. त्यातून छत्रपती शिवाजी महाराज आणि हुतात्म्यांचा अवमान करण्यात आल्याने शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या प्रवेशद्वारावरच तीव्र आंदोलन केले होते.

n शिवसेना दक्षिण मुंबई विभाग क्र. 12 तर्फे विभागप्रमुख संतोष शिंदे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या आंदोलनामध्ये मेट्रो प्रशासनाला तत्काळ जाहिरातदारांची घुसखोरी हटवण्यासाठी इशारा देण्यात आला होता. त्या आंदोलनानंतर मेट्रो प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मेट्रो स्थानकाच्या नावामध्ये जाहिरातदाराचा उल्लेख असलेले प्रवेशद्वारावरील नामफलक हटवले आहेत. शिवसेनेने आक्रमक भूमिका घेऊन मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला ताळय़ावर आणल्याने मुंबईकर आणि शिवप्रेमींकडून समाधान व्यक्त केले जात आहे.