मुंबईची हवा बिघडली, श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ

मुंबईच्या हवेच्या गुणवत्तेचा स्तर चांगलाच घसरला आहे. प्रदूषणात प्रचंड वाढ झाली असून श्वसनविकाराच्या रुग्णांमध्ये तब्बल 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे हवेची गुणवत्ता नोंदवणाऱया ‘सफर’ अर्थात ‘सिस्टम ऑफ एयर क्वॉलिटी ऍण्ड वेदर फोरकास्टिंग ऍण्ड रिसर्च’ने म्हटले आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर धुरक्याची आणि धुक्याची चादर आहे. थंडीचा मुक्काम वाढला आहे, परंतु प्रदूषणामुळे पहाटेच्या सुमारास दृश्यमानताही कमी झाल्याचे दिसत आहे. प्रदूषणामुळे दम्याच्या रुग्णांना त्रास जाणवत असून श्वास घेण्यासही प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे मुंबईतील रुग्णालये, दवाखान्यांमध्ये रुग्णांची मोठी गर्दी दिसत आहे.

गेल्या दोन आठवडय़ांत हवेची गुणवत्ता घसरल्यामुळे आणि सततच्या बदलत्या हवामानामुळे श्वसनाच्या आजारांमध्ये वाढ झाली आहे. खोकला, शिंका, ताप, घसा खवखवणे, नाक वाहणे, अंगदुखी अशा तक्रारी घेऊन येणाऱया रुग्णांमध्ये 20 टक्क्यांनी वाढ झाल्याचे चेंबूरमधील झेन मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे चेस्ट फिजिशियन डॉ. अरविंद काटे यांनी सांगितले.

येथील हवा बिघडली

बोरिवली, मालाड, अंधेरी, बीकेसी, चेंबूर, माझगाव आणि नवी मुंबई येथील हवा बिघडली असून भांडुप, वरळी, कुलाबा येथे काही प्रमाणात प्रदूषण असल्याची नोंद ‘सफर’ने केली आहे.

मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱयांना आजारांचा धोका

पहाटेच्या सुमारास हवेत धुलीकणांचे प्रमाण सर्वाधिक असते. त्यामुळे मॉर्निंग वॉकसाठी जाणाऱयांना आजाराचा जास्त धोका संभवत असल्याचे डॉक्टरांनी म्हटले आहे. थंडीत सकाळी लवकर बाहेर जाणे टाळा, वाफ घ्या असा सल्ला डॉक्टरांनी दिला असून ब्राँकॉयटीस, फुप्फुसातील फायब्रोसिस आणि दम्याचे रुग्ण एयर प्युरीफायरचा वापर करू शकतात असेही डॉक्टरांनी म्हटले आहे.

हवा आणखी बिघडणार

पुढील दोन दिवसांत हवा आणखी बिघडणार असल्याचा अंदाज ‘सफर’ने व्यक्त केला आहे. घराबाहेर पडताना चेहरा झाकावा, धूम्रपान करू नये, सरकारनेही कठोर उपाययोजना राबवाव्यात. आहारात सफरचंद, जर्दाळू, सोयाबिन, अक्रोड यांसारख्या ताज्या फळांचा तसेच भाज्यांचा समावेश करावा असा सल्ला अपोले स्पेक्ट्रा हॉस्पिटलच्या कन्सल्टंट फिजिशियन डॉ. पूर्वी छाबलानी यांनी दिला.

आपली प्रतिक्रिया द्या