
मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक-2025 साठी उद्या 11 नोव्हेंबर रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडत काढली जाणार आहे. वांद्रे पश्चिम येथील बालगंधर्व रंगमंदिर येथे सोडत कार्यक्रम पार पडेल. या लॉटरीमधून आरक्षणाची कुणाला लॉटरी लागणार आणि कुणाची संधी हुकणार हे स्पष्ट होणार असल्याने इच्छुकांची धाकधूक वाढली आहे.
गेल्या साडेतीन वर्षांपासून लांबलेल्या निवडणुकांची सोडत निघणार असल्याने इच्छुक उमेदवारांमध्ये निवडणुकीची प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या आरक्षण सोडतीमध्ये अनुसूचित जाती (महिला), अनुसूचित जमाती (महिला), मागासवर्ग प्रवर्ग (पुरुष), नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग (महिला) व सर्वसाधारण महिलांसाठी आरक्षण निश्चिती करण्यासाठी सोडत काढण्यात येणार आहे. वांद्र्याच्या बांलगंधर्व सभागृहात सकाळी 11 वाजता तळमजला, सभागृह येथे होईल.
अशी होणार कार्यवाही
11 नोव्हेंबर रोजी आरक्षणाची सोडत काढण्यात येईल. त्यानंतर 14 नोव्हेंबर रोजी आरक्षणाचे प्रारूप प्रसिद्ध होईल. 14 नोव्हेंबर ते 20 नोव्हेंबर दुपारी 3 वाजेपर्यंत आरक्षण प्रारूपावर हरकती व सूचना स्वीकारल्या जातील.
हरकती व सूचना दाखल करण्यासाठी निवडणूक प्रभागाशी संबंधित कार्यालयाचा पत्ता आणि इतर तपशील बृहन्मुंबई महानगरपालिका संकेतस्थळावरील https://www.mcgm.gov.in/irj/portal/anonymous/qlBMCGE2025 या लिंकवर उपलब्ध आहे. दाखल झालेल्या हरकती व सूचना विचारात घेऊन आरक्षणाची अंतिम अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येईल.




























































