
महापालिकेचा घनकचरा विभाग करणार इंदूर अभ्यास दौरा
मुंबई महापालिका मुंबईकरांना पाणी, आरोग्य, शिक्षण, रस्ते यासारख्या सुविधा माफक दरात देत असताना शहराची स्वच्छता आणि सौंदर्य अबाधित राखण्यासाठी मुंबई महापालिका लवकरच शहरात स्वच्छतेचा इंदूर पॅटर्न राबवणार आहे. मुंबईतील घनकचऱयाचे व्यवस्थापन आणखी चांगल्या प्रकारे करण्याच्या उद्देशाने घनकचरा व्यवस्थापनाचे अधिकारी, कर्मचारी दोन दिवसांच्या इंदूर अभ्यास भेटीवर जाणार आहेत.
मुंबई महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागातील कनिष्ठ पर्यवेक्षक आणि अभियंता इंदूर येथे दोन दिवसांच्या अभ्यास भेटीवर जाणार आहेत. या दोन दिवसांच्या अभ्यास भेटीत घरोघरी 100 टक्के कचरा संकलन, ओला-सुका कचरा वर्गीकरण, वाहतूक नियोजन, कचरा विल्हेवाटीचे सुयोग्य नियोजन तसेच सार्वजनिक स्वच्छता आदींबाबतची माहिती घेतली जाणार आहे. दरम्यान, मुंबई महापालिका सार्वजनिक स्वच्छतेतही अग्रेसर आहे. स्वच्छता अभियानात देशात ‘टॉप टेन’ मध्ये येण्याची महापालिकेची क्षमता आहे. त्यामुळे स्वच्छता अभियानात देशात पहिल्या दहामध्ये अर्थात ‘टॉप टेन’ मध्ये येण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे, अशी माहिती अतिरिक्त पालिका आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.





























































