मुंबईला संगीतमय साद, म्युझिक व्हिडीओ प्रोजेक्ट स्पर्धेची उत्सुकता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

ज्या लोकांनी स्वप्ने पाहण्याची हिंमत केली आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी ते मुंबईत आले, त्यांना मुंबईने नेहमीच साथ दिली. हे महानगर नेहमीच सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरले आहे आणि पुढेही राहाणार आहे. अनेक कलावंतांनी मुंबईवरील आपले प्रेम संगीतमयरित्या व्यक्त केले आहे. तरुण प्रतिभावंतांनी मुंबईचे पुन्हा एकदा वेगळ्याप्रकारे चित्रण करावे, यासाठी मुंबई महानगरपालिकेने द काळा घोडा आर्ट्स फेस्टिव्हलच्या सहकार्याने ‘म्युझिक व्हिडीओ प्रोजेक्ट’ स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेसाठी आतापर्यंत 40 संघ, 9 सोलो संगीतकारांनी नावनोंदणी केली आहे. अजूनही कलाकार स्पर्धेत भाग घेत आहेत. स्पर्धेतून मुंबईचे एक वेगळे रूप, मुंबईचा आवाज जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोचणार आहे. संगीतकार मिलिंद जोशी आणि शांतनू मोईत्रा, दिग्दर्शक रीमा कागती, अॅडगुरु भरत दाभोळकर, गाना डॉट कॉमच्या मनीषा डे आणि रोलिंग स्टोनच्या निर्मिका सिंग ‘म्युझिक व्हिडीओ प्रोजेक्ट’ स्पर्धेच्या ज्युरी पॅनेलमध्ये आहेत. स्पर्धेसाठी प्रवेशिका देण्याची अंतिम तारीख 14 ऑगस्ट 2022 आहे.