
मध्य रेल्वेच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, दादर आणि लोकमान्य टिळक टर्मिनस अशा मुख्य टर्मिनसवर प्रवाशांना आता फेस कव्हर, एन – 95 मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझर या सध्याच्या घडीला महत्वाच्या असणार्या वस्तू ‘नॉन फेअर रेव्हेन्यू’ अंतर्गत माफक दरात पुरविणारे ऑटोमेटीक वेन्डींग मशिन डिस्पेन्सर बसविण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. तसेच कल्याण, ठाणे आणि लोकमान्य टिळक टर्मिनसपाठोपाठ आता उर्वरित 12 उपनगरीय स्थानकांवर बॉडी मास इंडेक्स, ब्लड शुगर, ब्लड प्रेशर तपासून झटपट निदान करणार्या ‘हेल्थ एटीएम किओस्क’ मशिन बसविण्यात येणार आहेत.
रेल्वेने 12 मे पासून राजधाीनच्या मार्गावर 30 वातानुकूलित ट्रेन सुरू केल्या, त्यानंतर 1 जूनपासून 200 वेळापत्रकावर आधारित धावणार्या मेल-एक्स्प्रेस सुरू केल्या आहेत. त्यामुळे रेल्वेच्या टर्मिनसवर ‘सोशल डिस्टन्सिंग’चे नियम पाळून प्रवाशांना राज्य आणि केंद्र सरकारचे सर्व संकेत पाळून प्रवास करावा लागत आहे. प्रवाशांना चांगले दर्जेदार फेस कव्हर, मास्क आणि हॅण्ड सॅनिटायझरच्या बॉटल्स माफक दरात मिळणे सोयीचे व्हावे यासाठी हे अभिनव पद्धतीचे वेंडिंग मशिन बसविण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे. त्यामुळे प्रवासात आपला फेस मास्क जुना झाला असेल किंवा सॅनिटाझयर संपले असेल तर घाईघाईत नकली वस्तू घेण्यापेक्षा चांगल्या दर्जेदार ‘कोविड-१९’ बचावाच्या वस्तू विकत घेणे प्रवाशांना सोपे होणार आहे.
या 12 स्थानकांत झटपट आरोग्य चाचण्या
हेल्थ एटीएम किओस्कच्या माध्यमातून सतत घड्याळ्याच्या काट्यावर धावणार्या मुंबईकरांना स्वतच्या आरोग्याची तपासणी करणे सोपे होणार आहे. या मशिनमध्ये 16 ते 18 प्रकारच्या आरोग्य चाचण्यांचे निदान झटपट करण्याची सोय आहे. या माशिनद्वारे 50 रूपयात बेसिक 16 चाचण्या तर 100 रूपयांत हिमोग्लोबिन व ब्लड शुगरसह 18 चाचण्या करता येतात अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. ठाणे, कल्याण आणि एलटीटीनंतर आता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, वडाळा रोड, चेंबुर, पनवेल, दादर, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड, डोंबिवली आणि बदलापूर आदी 12 स्थानकांत हेल्थ एटीएम किओस्क बसविण्यासाठी ई-टेंडर काढण्यात आल्याचे मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक शलभ गोयल यांनी म्हटले आहे.
























































