
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसहून नागपूरला जाणाऱया दुरांतो एक्स्प्रेसचे इंजिन आज टिटवाळा येथे फेल झाले. त्यामुळे रेल्वेने सदर गाडी जवळपास दीड तास सायडिंगला टाकल्याने उकाडय़ामुळे प्रवासी चांगलेच हैराण झाले होते. नागपूरला जाणारी दुरांतो एक्प्रेस सीएसएमटी येथून रात्री 8.15 वाजता सुटते. त्यानुसार गाडी वेळेवर सुटली खरी, पण टिटवाळा येथे पोहोचताच गाडीचे इंजिन फेल झाले. त्यामुळे गाडी वेग पकडत नव्हती. त्यामुळे सदर गाडी टिटवाळा येथे सायडिंगला उभी करून दुसऱया इंजिनची व्यवस्था करण्यात आली. त्याला बराच वेळ लागल्याने प्रवाशांची चांगलीच गैरसोय झाली. तसेच गाडीत असलेली लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकही उकाडय़ाने पुरते हैराण झाले होते. दरम्यान, गाडी का थांबली आहे, किती वेळाने पुढे जाणार याबाबत रेल्वेकडून कोणतीच उद्घोषणा होत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली.































































