नेस वाडीयाला मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । मुंबई

बॉलिवूड अभिनेत्री प्रीती झिंटा हिने चार वर्षापूर्वी विनयभंग व मारहाण केल्याप्रकरणी पूर्वाश्रमीचा प्रियकर नेस वाडीया याच्यावर छेडछाडीचा गुन्हा दाखल केला होता. तो मुंबई उच्च न्यायालयाने रद्दबातल केला आहे. यामुळे नेसला दिलासा मिळाला आहे. दरम्यान याप्रकरणी दोन्ही पक्षकारांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलू नये असे निर्देशही न्यायालयाने त्यांना दिले आहेत.

30 मे 2014 रोजी आयपीएलदरम्यान वानखेडेवर एका मॅचदरम्यान प्रीती व नेसमध्ये वाद झाला होता. त्यावेळी नेसने प्रीतीवर हातही उगारला होता. या प्रकरणी प्रीतीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यानंतर पोलिसांनी नेसला अटक केली होती. मात्र 20 हजाराच्या जातमुचलक्यावर त्याला जामीन देण्यात आला होता.

काही वर्षांपूर्वी प्रीती झिंटा व नेस वाडीया यांचे अफेयर होते. त्यावेळी या दोघांनी मिळून आयपीएलची ‘किंग्ज इलेव्हन’ ही टीम विकत घेतली होती. त्यानंतर मात्र या दोघांचे नाते तुटल्याने त्यांचे मार्ग वेगळे झाले. त्यानंतर प्रीतीने जीन गुडइनफ याच्यासोबत लग्न केले.

दरम्यान, या प्रकरणानंतर प्रसिद्धी माध्यमांबरोबर बोलताना प्रीती म्हणाली होती की माझ्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नव्हता. कारण जे काही झाले ते अनेक लोकांच्या समक्ष झाले होते. आयुष्यात प्रत्येकासाठी एक सीमारेषा असणे गरजेचे आहे. पण तरीही जे काही झाले ते दुर्भाग्यपूर्ण होते. तसेच सध्या हे प्रकरण न्यायालयात असल्यामुळे मी अधिक बोलू शकत नाही. असे सांगून प्रीतीने या विषयावर बोलण्यास नकार दिला होता. पण आता न्यायालयाने नेसवरील गुन्हा रद्दबातल केला आहे.