घाटकोपरच्या दर्शन ज्वेलर्सवर दिवसाढवळय़ा दरोडा; मालकावर चाकूने वार, सराफांमध्ये घबराट

दिवाळीनिमित्त बाजारपेठांमध्ये खरेदीची लगबग सुरू असतानाच घाटकोपरमध्ये आज एक  दरोडय़ाची थरारक घटना घडली. सकाळी दुकाने सुरू व्हायच्या वेळेस तिघांनी दर्शन ज्वेलर्सवर सशस्त्र दरोडा टाकला. मालकावर चाकूने वार करत दरोडेखोर 30 ग्रॅम सोने चोरून सटकले. शिवाय त्यांनी हवेत गोळीबारदेखील केला. या घटनेमुळे घाटकोपरमधील सराफांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले आहे.

घाटकोपर पश्चिमेकडील गोळीबार रोडवर दर्शन ज्वेलर्सचे दुकान आहे. सकाळी नेहमीप्रमाणे दुकान सुरू झाल्यानंतर दुचाकीवरून आलेले दोन अज्ञात व्यक्ती दुकानात घुसले. त्यांच्यापाठोपाठ आणखी एक व्यक्ती गेला. मग तिघांनी दुकानात एकटय़ाच असलेल्या मालकाला चापूचा धाक दाखवत धमकावले. मग त्यांनी सोन्याचे दागिने असलेला ट्रे खेचू लागले. तेव्हा मालकाने आरडाओरड सुरू करताच एकाने सोबत आणलेला चापू काढून मालकाच्या गळ्यावर फिरवला. त्यानंतर आरोपींनी 30 ग्रॅम सोने घेऊन ते दुकानातून बाहेर पळाले.

हवेत केला गोळीबार

त्यानंतर दोघे डिओ दुचाकीवरून पळून गेले तर एक पळत गेला. ते पळत असताना दुकानदार आरडाओरड करत असल्याने आरोपीने हवेत गोळीबार केला. त्यामुळे घाटकोपरमधील सराफांमध्ये घबराटीचे वातावरण पसरले. या प्रकरणी घाटकोपर पोलीस ठाण्यात दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला असून पोलिसांची पथके तसेच गुन्हे शाखेची पथके आरोपींचा शोध घेत आहेत.