सोन्याचा मुलामा असलेला मंदिरावरील कळसाची चोरी, पंतनगर पोलिसांनी 24 तासांत आरोपीला केले गजाआड

घाटकोपर पूर्वेकडील श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिरावरील सोन्याचा मुलामा असलेल्या पंचधातूच्या कळसाची चोरी करण्यात आली होती. कळसच चोरीला गेल्याचे समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली होती. मात्र पंतनगर पोलिसांनी गुह्याची गंभीरता लक्षात घेत तत्काळ तपास करून कळस चोरणाऱ्या आरोपीला 24 तासांच्या आत बेड्या ठोकल्या. शिवाय त्याने घरात लपवून ठेवलेला तीन लाख किमतीचा कळस पोलिसांनी हस्तगत केला.

श्री नेमिनाथ दिगंबर जैन मंदिराचा कळस शुक्रवारी चोरीला गेल्याचे वृत्त परिसरात पसरताच खळबळ उडाली. मंदिराच्या पुजाऱ्याने तत्काळ पंतनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन चोरीची तक्रार दिली. याप्रकरणी चोरीचा गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक लता सुतार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकांनी गुह्याचा तपास सुरू केला. पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर मंदिरावरील कळस काढून एक व्यक्ती रिक्षाने जात असल्याचे आढळून आले. मग पोलिसांनी शुक्रवारी रात्री अमर महल येथून त्याला उचलले. चौकशीत त्याने चोरीची कबुली दिल्यानंतर त्याने त्याच्या घरात ठेवलेला पंचधातूचा कळस पोलिसांनी जप्त केला. विजय ऊर्फ बल्ल्या लोंढे (32) असे त्या आरोपीचे नाव असून त्याच्या विरोधात पंतनगर पोलीस ठाण्यात विनयभंग व एनडीपीएस असे दोन गुन्हे दाखल आहेत.