
बोरिवली रेल्वे स्थानकात विनातिकीट प्रवाशाने तिकीट तपासणीस कार्यालयातील मालमत्तेची तोडफोड केल्याच्या घटनेनंतर पश्चिम रेल्वेने ‘नमस्ते’ अभियान राबवण्यास सुरुवात केली आहे. या अभियानांतर्गत तिकीट तपासणीस अर्थात टीसी आता विनातिकीट प्रवाशांसोबतदेखील नम्रतेने वागणार आहेत. टीसी आणि प्रवाशांमध्ये वारंवार होणारे वाद टाळण्यासाठी पश्चिम रेल्वेने ही अनोखी मोहीम हाती घेतली आहे.
गेल्याच आठवडय़ात बोरिवली स्थानकात विनातिकीट प्रवाशाने गोंधळ घातला होता. अशा घटना रोखण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाने ‘नमस्ते’ मोहीम हाती घेतली आहे. याअंतर्गत टीसी कर्मचारी प्रवाशांसोबत नम्रतेने वागत दंडात्मक कारवाई करणार आहेत. टीसी प्रवाशांना सर्वप्रथम ‘नमस्ते’ करणार आहेत.
सकारात्मक बदलाची आशा
दरदिवशी पश्चिम रेल्वेच्या कोणत्याही स्थानकात अचानक जाऊन तेथे तिकीट तपासणीची ‘नमस्ते’ मोहीम राबवली जाईल. या मोहिमेमुळे टीसी-प्रवासी यांच्यातील वादाच्या घटना निश्चितच कमी होतील. तसेच पुढच्या काही महिन्यांत विनातिकीट प्रवाशांची संख्या कमी झाल्याचेही सकारात्मक चित्र दिसेल, असा विश्वास पश्चिम रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी विनित अभिषेक यांनी व्यक्त केला.