महाराष्ट्र विद्यालयात हायटेक शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, रोबोटिक ट्रेनिंग, अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब; गोरेगावची मराठी शाळा टिकवण्यासाठी अभिनव पाऊल

इंग्रजीच्या अतिरेकामुळे सहा वर्षांत मुंबईतील मराठी माध्यमाच्या 39 शाळा बंद पडल्या आहेत. केवळ हातावर हात धरून न बसता आपली मराठी शाळा टिकावी यासाठी गोरेगाव पश्चिमेच्या नूतन विद्या मंदिर संचलित महाराष्ट्र विद्यालयाने अभिनव पाऊल उचलले आहे. अत्याधुनिक कॉम्प्युटर लॅब, सुसज्ज विज्ञान प्रयोगशाळा, स्मार्ट क्लासरूम, रोबोटिक ट्रेनिंग, काैशल्य विकास प्रशिक्षण अशा इंग्रजी शाळेच्या तोडीच्या हायटेक सुविधा या शाळेतील मराठी माध्यमाच्या मुलांना देण्यात येणार आहेत.

मंगला उपाध्ये आणि त्यांचे पती न.वा. उपाध्ये (राजा उपाध्ये) यांनी 1956 साली आपल्या घरात दहा विद्यार्थ्यांसह या शाळेची सुरुवात केली. 1964 साली नूतन विद्या मंदिर संस्थेची स्थापना झाल्यानंतर हाऊसिंग बोर्डाच्या गाळेवजा खोल्यांमध्ये शाळा सुरू झाली. 2012 साली शिवसेना नेते-आमदार सुभाष देसाई यांच्या प्रयत्नातून शाळेची सुसज्ज इमारत उभी राहिली. सध्या महाराष्ट्र विद्यालयात मराठी आणि इंग्रजीची दहावीपर्यंत शाळा आणि ज्युनिअर कॉलेज सुरू आहे. जवळपास 1 हजार विद्यार्थी शाळेत शिकत असून त्यापैकी मराठी माध्यमाचे 700 विद्यार्थी आहेत. यंदा पहिलीला 22 विद्यार्थी शिकत असून गेल्या दोन ते तीन वर्षांपासून पहिलीची पटसंख्या साधारण एवढीच आहे. त्यामुळे मराठीत माध्यमाच्या विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी शाळेचे अध्यक्ष संदीप सावंत, सचिव अनिल देसाई आणि संचालक मंडळ, माजी विद्यार्थी प्रयत्नशील आहेत.

स्थलांतराचा फटका

तीन डोंगरी, उन्नत नगर, हनुमान नगर येथील बरीचशी मुले या शाळेत मराठी माध्यमात शिकायला यायची. येथील झोपड्यांचा पुनर्विकास सुरू असून त्याजागी टोलेजंग इमारती उभ्या राहत आहेत. मराठी कुटुंबीयांच्या स्थलांतराचा मोठा फटका या शाळेला बसला आहे.

काही वर्षांपूर्वी आमच्या शाळेत 1200 विद्यार्थी होते तेव्हा शिक्षकांचा 56 जणांचा स्टाफ होता. आता मराठीचे केवळ 700 विद्यार्थी असल्यामुळे आमच्याकडे केवळ 20 जणांचा स्टाफ आहे. महाराष्ट्रात मराठी शाळा बंद होतायत यासारखे दुर्दैव नाही. – विद्या शेवडे, सदस्य, नूतन विद्या मंदिर ट्रस्ट

मराठीत शिकणाऱया विद्यार्थ्यांची संख्या वाढावी यासाठी आमची काही स्वयंसेवी संस्थांसोबत बोलणी सुरू आहेत. परिस्थितीमुळे शिक्षणापासून वंचित राहणाऱया मुलांच्या शिक्षणाचा खर्च उचलण्याची आमची तयारी आहे. यासाठी रोटरी क्लबचे आम्हाला सहकार्य लाभले. – अनिल देसाई, सचिव, नूतन विद्या मंदिर ट्रस्ट