
मध्य रेल्वेकडून या आठवड्याच्या शेवटी आणि पुढील आठवड्यात मुख्य, हार्बर आणि ट्रान्स-हार्बर मार्गांवर सहा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहेत. यामुळे अनेक उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या सेवांवर याचा परिणाम होणार आहे. गर्डर लाँच करणे, ट्रॅक स्ट्रक्चर बदलणे आणि इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग सिस्टम बसवणे आदी कामांसाठी हे ब्लॉक घेण्यात येणार आहेत.
ठाणे ते कल्याण दरम्यान 23 नोव्हेंबर रोजी मुख्य मार्गावर अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी सकाळी 10.30 ते दुपारी 3.40 पर्यंत मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. यादरम्यान अप आणि डाऊन जलद मार्गावरील लोकल पाचव्या मार्गिकेवर वळवण्यात येतील. तर काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
22 नोव्हेंबर रोजी रात्री 11.45 ते 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 11.45 पर्यंत बेलापूर आणि पनवेल दरम्यान सेवा खंडित केल्या जातील. हार्बर मार्गावरील गाड्या बेलापूर, नेरुळ आणि वाशी येथे शॉर्ट-टर्मिनेट होतील किंवा सुरू होतील, तर ट्रान्स-हार्बर सेवा फक्त ठाणे आणि नेरुळ/वाशी दरम्यान सुरू राहिल. अनेक लोकल सेवा रद्द किंवा कमी केल्या जातील.
बदलापूर येथे रोड ओव्हरब्रिजसाठी 18 स्टील गर्डर बसवण्यासाठी 22 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर दरम्यान वांगणी आणि अंबरनाथ दरम्यान रात्रीचा ब्लॉक लागू केला जाईल. पहाटे 2.00 ते पहाटे 3.30 पर्यंतच्या या ब्लॉकमुळे उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांवर परिणाम होईल.
उंबरमाळी येथे नवीन इलेक्ट्रॉनिक इंटरलॉकिंग प्रणाली सुरू करण्यासाठी कसारा आणि खर्डी दरम्यान 22 नोव्हेंबर रोजी रात्री 10.40 ते 23 नोव्हेंबर रोजी सकाळी 7.40 पर्यंत आणखी एक ब्लॉक आहे.
पनवेल-कळंबोली येथे टर्मिनस आणि कोचिंग कॉम्प्लेक्सच्या विस्तारीकरणाच्या कामासाठी 3 डिसेंबरपर्यंत विशेष रात्रकालीन ब्लॉक घेण्यात येणार आहे. यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलमधून धावणाऱ्या सुमारे 20 लांब पल्ल्याच्या गाड्यांवर याचा परिणाम होईल.
फ्रेट कॉरिडॉरसाठी शिळफाटा रोड ओव्हरब्रिज पाडण्यासाठी 25 नोव्हेंबर ते 8 डिसेंबर दरम्यान ठाण्यातील निलजे-दातिवली मार्गावर पहाटे 1.10 ते 4.10 पर्यंत ब्लॉक घेण्यात येईल. यामुळे किमान सहा लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळापत्रकात बदल करण्यात येणार आहे.





























































