मालाडमध्ये जादूटोणा करून वृद्ध महिलेला घाबरवले

वृद्ध महिलेला घाबरवण्यासाठी अज्ञात व्यक्तीने जादूटोणा केल्याची संतापजनक घटना मालाड परिसरात घडली आहे. याप्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला आहे. तक्रारदार महिला या ज्येष्ठ नागरिक आहेत. त्या मालाड पश्चिम येथील एका बंगल्यात तीन नोकरांसोबत राहतात. 23 जुलैला रात्री 12 ते 12.10 दरम्यान अज्ञात व्यक्तीने महिलेवर जादूटोणा व्हावा आणि तिला घाबरवण्यासाठी जादूटोण्याचे कृत्य केले.

जादूटोणाला महिला या घाबरतील आणि तिला वश करून त्याचा काही फायदा होईल या भीतीने पांढऱ्या कपड्यात महिलेचे दोन फोटो ठेवले. त्या फोटोसोबत खापराचे मडके, अगरबत्ती, दोन लिंबू, दोन अंडी, तांदूळ, कुंकू ठेवले. त्या घटनेतून महिला सावरत नाहीत तोच तीन दिवसांपूर्वी एका सफेद कपड्यात दोऱ्याने गुंडाळलेला नारळ, कट केलेले लिंबू, लाल कुंकू, तांदूळ आणि जादूटोणाचे साहित्य त्यांच्या बंगल्याच्या मागील महिलेला दिसले. हा प्रकार महिलेच्या लक्षात आला. त्यांनी मालाड पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली.

या प्रकरणी मालाड पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमनुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद केला. ते कृत्य कोणी केले याचा तपास पोलीस करत आहेत.