
आरे कॉलनी येथील एका बंगल्यात घरफोडी झाली होती. आरोपींनी सोने-चांदीचे दागिने, जुन्या मूर्ती, तांब्या-पितळेची भांडी असा लाखो रुपयांचा ऐवज चोरून नेला होता. याप्रकरणी तक्रार दाखल होताच आरे सब पोलिसांनी शिताफीने तपास करत घरफोडी करणाऱ्या बाप-लेकाच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून चोरीचा सर्व ऐवज हस्तगत करण्यात आला.
आरे कॉलनीतल्या रॉयल पाम्स येथील मयूरनगरात 31 क्रमांकाचा बंगला असून बंगल्याचे मालक परदेशात गेले आहेत. तर 18 तारखेला बंगल्यात रात्री चोरी झाल्याचा प्रकार समोर आला. अज्ञात आरोपींनी पाठीमागील बाजूकडच्या बंगल्याच्या हॉलची काच तोडून आत घुसखोरी करत किमती ऐवज चोरून नेला होता. त्यामुळे दुसऱ्या दिवशी बंगल्याची देखभाल करणारे गंगाराजम यांनी मालकाशी संपर्क साधून आरे सब पोलीस ठाण्यात घरफोडीची तक्रार दिली होती. तिजोरी चोरीला गेली होती, परंतु त्यात नेमके किती ऐवज होता हे गंगाराजम यांना सांगता येत नव्हते.
दरम्यान, वरिष्ठ निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक मंगेश अंधारे, उपनिरीक्षक सचिन पांचाळ व पथकाने तपास सुरू केला. परिसरातील 35 हून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासल्यावर दोघेजण संशयास्पद फिरताना दिसून आले, परंतु फुटेज अस्पष्ट असल्याने त्यांचे चेहरे व्यवस्थित दिसून येत नव्हते. मग पांचाळ व त्यांच्या पथकाने मानवी कौशल्याच्या आधारे शोध घेतला असता नियामतुल्ला खान ऊर्फ जुली (38) आणि त्याचा मुलगा शाहिद खान (19) या बाप-लेकाने ही घरफोडी केल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार दोघांनाही पकडण्यात आले. त्यांच्याकडून सोने-चांदीच्या दागिन्यांसह तांब्या-पितळेची भांडी, मूर्ती असा तब्बल 47 लाख 65 हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आला. दोघेही रेकॉर्डवरचे आरोपी आहेत.



























































