
सहकाऱ्याला बलात्काराच्या खोट्या गुन्ह्यात अडकत एक कोटी रुपयांची मागणी करणाऱ्या महिला बँक कर्मचारीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. कांदिवलीतील चारकोप परिसरात ही घटना घडली असून महिलेवर ब्लॅकमेलिंग आणि खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉली कोटक असे महिलेचे नाव असून ती कांदिवलीतील एका नामांकित खासगी बँकेत नोकरी करत होती.
डॉली कोटकने ती काम करत असलेल्या बँकेतील माजी आयटी विभागाच्या कर्मचाऱ्यावर बलात्काराचा खोट्या आरोप करत तुरुंगात पाठवले. जामिनासाठी ना हरकत प्रमाणपत्राच्या बदल्यात पीडिताच्या बहिणीकडे न्यायालयाच्या आवारातच एक कोटी रुपयांची मागणी केल्याचा आरोप डॉलीवर आहे. पैशांची मागणी पूर्ण न झाल्यास गंभीर परिणाम भोगावे लागलील अशी धमकीही डॉलीने पीडितेच्या बहिणीला दिली.
याशिवाय डॉलीने अन्य कर्मचाऱ्यांच्या मदतीने पीडित आणि त्याच्या पत्नीचा खासगी आणि आर्थिक डेटाही अनधिकृतरित्या मिळवला. पीडिताचा अकाऊंट आणि गूगलशी जोडलेला मोबाईल नंबर बदलून डॉलीने स्वतःचा मोबाईल नंबर टाकला. याद्वारे डॉलीने पीडित आणि त्याच्या पत्नीचा ऑनलाईन बँकिग डेटा, जीपीएस लोकेशन हिस्ट्री, खासगी फोटो, लोकेशनची माहिती मिळवली.
डॉलीने बँकेच्या एचआर विभागाकडे पीडिताविरोधात खोटी तक्रार दिल्याने त्याला नोकरीही सोडावी लागली. पीडिताचा वारंवार होणारा छळ आणि पोलिसांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पीडिताने बोरीवली न्यायदंडाधिकारी न्यायालयाकडे दाद मागितली. न्यायालयाने चारकोप पोलिसांना भारतीय नागरी सुरक्षा संहिता (BNSS) च्या कलम 175(3) अंतर्गत एफआयआर नोंदवण्याचे आदेश दिले. या प्रकरणात, पोलिसांनी डॉली अरविंद कोटक, अन्य नामांकित बँकेचे संबंधित कर्मचारी प्रमिला वास आणि सागर अरविंद कोटक यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.