जितेंद्र आव्हाड यांच्यावर मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंबईतील मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी महाराष्ट्र विधानभवन परिसरात भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या राड्यानंतर पोलिसांनी आव्हाड यांच्या कार्यकर्त्याला अटक केली. यावेळी जितेंद्र आव्हाड आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांच्या गाडीसमोर बसून आंदोलन केलं. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जितेंद्र आव्हाड यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

दरम्यान, विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 30 जूनपासून सुरू झाले. तेव्हापासूनच भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यात अधिवेशन सुरू झाल्यापासून आरोप-प्रत्यारोपांचा सिलसिला सुरू आहे. चार दिवसांपूर्वी आव्हाड यांनी मंगळसूत्र चोर अशा घोषणा दिल्या होत्या. त्यानंतर बुधवारी विधान भवनाच्या गेटजवळच पडळकर आणि आव्हाड यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली होती. दोघांनीही एकमेकांना आव्हानाची भाषा केली होती. त्यानंतर पडळकरांच्या एका कार्यकर्त्याने व्हॉट्सअॅपवर धमकीचे मेसेज पाठवल्याचा स्क्रीनशॉट आव्हाड यांनी आज सकाळी सोशल मीडियावर पोस्ट केला होता आणि गुरुवारी विधान भवनात राडा झाला होता.