सहा फुटांपर्यंतच्या गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच, मोठ्या मूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्याची परवानगी यंदापुरती – हायकोर्ट

सहा फुटांपर्यंतच्या सर्व पीओपी गणेश मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करा, असे स्पष्ट आदेश उच्च न्यायालयाने सर्व महापालिकांना गुरुवारी दिले आहेत. हे आदेश देत गणेशोत्सव, नवरात्री, दुर्गा पूजेसह माघी गणेश जयंतीपर्यंत सर्व उत्सवातील सहा फुटांवरील उंच पीओपी मूर्त्यांचे विसर्जन समुद्रात करण्याचा मार्ग न्यायालयाने मोकळा केला आहे.

केवळ पाच फुटांपर्यंतच्या पीओपीच्या गणेश मूर्त्यांचे विसर्जन कृत्रिम तलावांत करणे शक्य आहे, असे महाधिवक्ता बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयात स्पष्ट केले. मात्र सहा फुटांपर्यंतच्या गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांतच करा, असे आदेश मुख्य न्यायमूर्ती अलोक अराधे व न्या. संदीप मारणे यांच्या खंडपीठाने दिले.हे अंतरिम आदेश माघी जयंतीपर्यंत लागू राहतील, असे न्यायालयाने स्पष्ट करावे, अशी विनंती महाधिवक्ता सराफ यांनी केली. ती न्यायालयाने मान्य केली.

पीओपीच्या मूर्तींचे विसर्जन पर्यावरणाला धक्का न लावता कृत्रिम तलावांतच करता येईल, असा तोडगा राज्य शासनाने स्थापन केलेल्या तज्ञ समितीने शोधावा, असे न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे.

कायमस्वरूपी तोडगा काढा!

न्यायालयाचा निर्णय दिलासादायक असून त्यामुळे मंडळांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. मात्र उंच मूर्तीच्या विसर्जनासंदर्भातील हा निर्णय केवळ एकाच वर्षासाठी मर्यादित न ठेवता त्यावर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी विनंती गणेशोत्सव समन्वय समितीचे अध्यक्ष अॅड. नरेश दहिबावकर यांनी केली.