
एल्फिन्स्टन पुलाची ऐतिहासिक कमान अखेर इतिहासजमा झाली. शनिवारी मध्यरात्री जेसीबीच्या सहाय्याने ही कमान पाडण्यात आली. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार’ चित्रपटातील काही भावनिक सीन्सचे शूटिंग याच पुलाच्या आवारात झाले होते. त्यानंतर एल्फिन्स्टन पूल आणि पुलाच्या पश्चिम भागातील कमान असंख्य लोकांच्या मनात घर करून राहिली. ही कमान पाडताना पाहून स्थानिक रहिवासी तसेच इतर नागरिक भावुक झाले.
125 वर्षांचा एल्फिन्स्टन पूल पाडून त्याजागी वरळी-शिवडी उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत जुना पूल पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात येत आहे. पुलाच्या दोन्ही बाजूकडील भाग काही दिवसांपूर्वी सपाट केला होता. याचदरम्यान ऐतिहासिक कमानीखालून पादचाऱयांची ये-जा बंद करण्यात आली होती. शनिवारी रात्री कमान पाडकामाला सुरुवात करण्यात आली. सवाशे वर्षे उलटूनही पुलाचे बांधकाम अत्यंत भक्कम होते. त्यामुळे पाडकाम करणाऱया यंत्रणेला कमानीची भिंत पाडण्यासाठी अनेक तासांची मेहनत घ्यावी लागली. संपूर्ण रात्रभर कमानीचे पाडकाम करण्यात आले आणि रविवारी सकाळी कमानीच्या दगडांचा ढिगारा हटवण्याचे काम हाती घेण्यात आले. दगड आणि मातीचा ढिगारा हटवण्यासाठी किमान चार ते पाच दिवस लागतील, अशी शक्यता संबंधित अधिकाऱयांनी वर्तवली. आता रेल्वे मार्गिकेवरील लोखंडी सांगाडा हटवण्याचे प्रत्यक्ष काम येत्या दोन दिवसांत हाती घेण्यात येणार आहे.
‘दिवार’ची कमान म्हणून बनली होती ओळख!
अमिताभ बच्चन यांच्या ‘दिवार’ चित्रपटातील अनेक महत्त्वाचे सीन्स एल्फिन्स्टन पुलाच्या कमानीशेजारी चित्रीत केले होते. या चित्रपटामुळे एल्फिन्स्टन पूलदेखील मुंबईची एक ओळख बनला होता, तर एल्फिन्स्टन पुलाची कमान ‘दिवार’ची कमान म्हणून ओळखली जात होती. अमिताभ यांच्या डायलॉग्जमुळे एल्फिन्स्टनची कमान अधिक प्रसिद्ध झाली होती.

























































